मराठी संस्था मोठी झाली की अनेकांच्या नजरा तिथे वळतात. डोंगळ्यासारखे लोक पदांसाठी त्याला चिकटू पाहतात. मराठी संस्थांवर इतरांचा डोळा आहे. तेव्हा आपापसात भांडू नका. मराठी माणसांनी काढलेल्या संस्था ठसठशीत ठेवा, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी येथेदिला. मुंबईची लोकभाषा मराठी आहे. त्यामुळे मुंबई शहरात दरवर्षी मराठी भाषेचा महोत्सव भरावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघात कै.डॉ. बाळ भालेराव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण (दि.११ ) शनिवारी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पानिपतकार विश्वास पाटील, हिंदुजा हॉस्पिटलचे विश्वस्त उषा रहेजा, सीईओ गौतम खन्ना, प्रमोद लेले, मूर्तिकार केदार दहिबावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मधुमंगेश कर्णिक पुढे म्हणाले, एशियाटिक लायब्ररी, मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी ग्रंथालय अशा मराठी संस्थामध्ये मराठी माणस आपापसात भांडू लागली आहेत. कुठल्याही मराठी माणसाने सांस्कृतिक विषयावर आपापसात वादविवाद निर्माण करणे हे पाप आहे. मराठीचं अस्तित्व ठसठशीतपणे अधोरेखित केले पाहिजे. मराठी माणसाने मराठी पण जागृत ठेवले पाहिजे. मी गिरगाव साहित्य संघाला काय दिले, हे माहीत नाही; पण साहित्य संघाचा मी व्यक्तिशः ऋणी आहे. अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.बुद्धिमत्ता आणि प्रतिमेमुळे समाजात साहित्यिकांचा प्रभाव पडतो. साहित्यिकांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे केलेल्या आंदोलनामुळे मराठी भाषा भवन आणि शालेय स्तरावर मराठी अनिवार्य करणे शासनाला भाग पडले असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. गिरगाव साहित्य संघाच्या वास्तूप्रमाणेच मराठी संस्थांवर इतरांचा डोळा आहे. त्या बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास मराठी माणसाच रक्त खवळून निघाले पाहिजे. मराठीच अस्तित्व टिकवण्यासाठी खास मुंबई शहरात मराठी भाषेचा महोत्सव भरावा, अशा आग्रही सूचनाही त्यांनी साहित्य संघाला यावेळी केल्या.
साहित्य संघाच्या पहिल्या मजल्यावर कै.डॉ. बाळ भालेराव यांचा अर्ध पुतळा बसविण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संघाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष डॉ. उज्वला मेहंदळे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश आचवल यानी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आठवणीतील नाट्यगीते हा जुन्या नाट्यगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने रसिकांनी साहित्य संघात गर्दी केली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत नाट्यगीते ऐकण्यासाठी रसिक उपस्थित होते.

0 टिप्पण्या