Top Post Ad

मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, सेवाभावी संस्थांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची व्यवहार्यता तपासून अंमलात आणा

मुंबई महानगर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्था ही त्रिसुत्री अधिक बळकट करण्यास प्राधान्य देण्यात यावे. स्वच्छतेत नवनवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्थांचे मार्गदर्शन घ्या. तसेच टीआयएसएस (Tata Institute of Social Sciences) सारख्या संस्थांचे मार्गदर्शन घ्या. त्यांचे अभ्यासगट करून मुंबई महानगर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना आज (दिनांक २९ एप्रिल २०२६) पहाटे आकस्मिक भेट देवून पाहणी केली. तसेच वडाळा परिसरातील सुका कचरा संकलन केंद्र आणि बरकत अली दर्गा मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग (वडाळा पूर्व) येथे दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छतेबाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा मार्ग  स्वच्छ करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी यावेळी दिले.

वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरात पाहणी करताना महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी घनकचराबाबतच्या विविध विषयांचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान त्यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. दररोज स्वच्छता वाहनांच्या किती फेऱ्या होतात, कचऱ्याचे वर्गीकरण-वहन कोणत्या पद्धतीने केले जाते, कोणत्या भागांत अधिक कचरा निर्माण होतो, अशा विषयांची सविस्तर माहिती जाणून घेतली. घराघरांतून संकलित होणारा कचरा आणि त्याच्या वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती भिडे यांनी दिले. विविध संकुलांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र नियोजन करणे, कचरा वर्गीकरणाबाबत विशेषतः दाटवस्ती भागात व्यापक जनजागृती करणे, तसेच ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना  भिडे यांनी केल्या.

घनकचरा व्यवस्थापन नागरी सहभागातून अधिक प्रभावी होऊ शकते. कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्थेसाठी नव्या संकल्पनांना वाव द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी सातत्याने संवाद साधा. त्यांना या अभियानाचा सक्रिय भाग बनवा. प्रमुख महाविद्यालयील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीता उपक्रम (Internship Program) राबवून त्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घ्या. स्वयंसेवी संस्थांना (Non Government Organization) सोबत घेवून दाटवस्तींमध्ये सुरू असलेले स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी केल्या.

मुंबईत अनेक प्रशासकीय विभागात (वॉर्ड आफिस) दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्टी आहे. अशा ठिकाणी जास्त प्रमाणात कचरा संकलित होतो. त्यामुळे अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली (Geographic Information System) करा. तसेच त्या वॉर्डमध्ये प्रत्येक रस्त्यांवरील कचरा संकलनाचा आराखडा तयार करून नेमलेल्या संस्थांकडून गोळा केलेल्या कचऱ्याची नोंद घ्यावी, त्याचा अभ्यास करुन मॉडेल विकसित करण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या. तसेच ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो तेथे प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवून निगराणी करण्याचेही निर्देश भिडे यांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छतेची दृश्यमानता (Visibility) वाढविण्याभर भर दिला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, त्याचे वर्गीकरण आणि वहन या त्रिसुत्रीवर लक्ष केंद्रीत केले आहे. विविध प्रशासकीय विभागांतील चौक्यांना भेट देत तेथील दैनंदिन कामकाज जाणून घेतले. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबतही त्यांनी माहिती घेतली. आज (दिनांक २९ एप्रिल २०२६) भेटीदरम्यान त्यांनी वडाळा, चुनाभट्टी आणि चेंबूर येथील नागरिकांशी संवाद साधला. रस्ते आणि परिसर स्वच्छतेबाबत थेट नागरिकांकडून माहिती घेतली. 

मुंबईतील बस थांब्यांवर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हा परिसर अधिक स्वच्छ ठेवावा. तसेच प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छतेची दृश्यमानता (Visibility) वाढविण्यासाठी लक्ष देण्यात यावे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली बेवारस वाहने हटविण्यात यावीत. तसेच राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरिवाल्यांवरही कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (महागनरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त (एफ उत्तर) श्री. अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पश्चिम) श्री. शंकर भोसले, सहायक आयुक्त (एल विभाग)श्री. धनाजी हेर्लेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com