Top Post Ad

BMC शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण

मुंबई महानगराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता दृकश्राव्य (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी असतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संबंधित उड्डाणपुलांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.


*मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवरील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने या तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.* या सोहळ्यास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच उपमहापौर श्री. संजय घाडी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून खासदार श्री. अनिल देसाई, खासदार श्री. संजय पाटील, खासदार श्री. रवींद्र वायकर, खासदार प्रा. (श्रीमती) वर्षा गायकवाड, आमदार श्री. अमित साटम,  आमदार श्री. पराग शहा, आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, आमदार डॉ. (श्रीमती) ज्योती गायकवाड, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. अनंत नर,आमदार श्री. सुनील प्रभू, आमदार श्री. सुनील शिंदे आणि श्री. राजहंस सिंह उपस्थित राहणार आहेत.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते श्री. विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते श्री. यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी - सक्रे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष श्रीमती यामिनी जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्रीमती संगीता शर्मा, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिष भांदीर्गे, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष श्रीमती हेतल गाला, विधी समिती अध्यक्ष श्रीमती दीक्षा कारकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष श्रीमती मीनल तुर्डे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम आदी उपस्थित राहणार आहेत. .स्‍थानिक नगरसेवक श्री. जगदीश मकुन्‍ननी थैईवालापिल, नगरसेविका श्रीमती साजिदा बाबू खान, नगरसेविका श्रीमती आशा काळे, नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम हेदेखील यावेळी उपस्थित असतील.

..........

*शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती –*

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP - 2) अंतर्गत मध्य रेल्वे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६वी) टाकण्याचे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शीव स्थानकाजवळच्या रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी काम रेल्वेच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले. तसेच, ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित ठरविण्यात आल्‍याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले.

 रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण व मजबूतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेमार्फत दक्षिण भागात नवीन पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. रेल्वेरुळांवरील पुलासाठी रेल्वे विभागामार्फत ४९६ टन वजनाचे व ५४.५ मीटर लांबी, २६ मीटर रुंदीच्‍या दोन 'सेमी - थ्रू स्टील गर्डर' चा वापर करण्यात आला आहे. पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गाखाली नविन पादचारी भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात आले असून दिनांक २० फेब्रुवारी२०२६ रोजी खुला करण्यात आला आहे. तसेच, संत रोहिदास मार्गाखालील, जुन्या पादचारी भुयारी मार्गाचे स्थानांतर व पुनर्बांधणी करुन दिनांक १४ जुलै २०२६ रोजी खुला करण्यात आला आहे.

पश्चिमेकडील कुर्ल्याच्या दिशेने लाल बहादूर शास्त्री मार्गावर व धारावीच्या दिशेने संत रोहिदास मार्गावर तसेच, पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे, अशाप्रकारे तीन मुख्य रस्त्यांच्या दिशेने भराव करून पोहोच रस्ते बांधण्यात आले आहेत. पोहोच रस्त्यांची मोजमापे ही धारावीच्या दिशेने लांबी ११० मीटर, रुंदी २७ मीटर, कुर्ल्याच्या दिशेने लांबी ९७ मीटर, रुंदी २९ मीटर डॉ. आंबेडकर मार्गाच्‍या दिशेने लांबी ६५ मीटर, रुंदी २७ मीटर आहे.

*प्रकल्पाचे फायदे –*

मुंबईच्या उपनगरीय सेवेत सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान ५ वी आणि ६ ची मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. शीव (Sion) स्थानकानजीकच्या जुन्या पुलाच्या रेल्वे रुळांमधील खांबांमुळे या नवीन मार्गिका टाकण्यात अडथळा येत होता. अंतर्वाही (through span) पद्धतीच्या नवीन पुलाच्या उभारणीमुळे अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन रेल्वे मार्गिकेचा विस्तार करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे उपनगरीय (लोकल) आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होईल.

हा पूल पश्चिम बाजूच्या धारावी, वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला तसेच पूर्वबाजूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व पुर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा पूर्व - पश्चिम दुवा आहे. पुलाची पुनर्बांधणी झाल्यामुळे अत्यंत वर्दळीचा जोडमार्ग सुरक्षितरित्या पुनर्स्थापित होणार आहे. या पुलाचे काम हे फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, या पुलाच्या कामात, उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या यांचे स्थानांतर करणे, बाधित वृक्ष, सार्वजनिक स्वछतागृहांचे स्थानांतर व पुनर्बांधणी अशा अडचणी असून देखील पुलाचे काम चार महिने अगोदर पूर्ण करण्यात आले आहे. शीव स्थानकानजीक, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या प्रकल्पाचे काम कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाच्या निधीमधून करण्यात आला आहे.

***

*विद्याविहार पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱया उड्डाणपुलाची संक्षिप्त माहिती*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळांवरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने उभारण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होणार असून घाटकोपर स्‍थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतूकही कमी होणार आहे.

 लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण ६०० मीटर लांबीच्या आणि १५.५० ते १७.५० मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा आहे. या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यांत विभागले आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्‍थापना आणि रेल्वे रुळांवर ९९.३४ मीटर लांबीच्या व २४.५० मीटर रुंदीच्या दोन तुळ्या बसवण्याचे काम ३१ मे २०२४ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात पूर्व व पश्चिम बाजूच्या ५०० मीटर लांब सेवा रस्त्यांचे बांधकाम, सोमय्या नाल्याचे विस्तारीकरण आणि मध्य रेल्वेच्या सेवा सुविधांचे स्थलांतर करण्याचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात आले.

 एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग (Approach Road) बांधण्यात आले आहेत. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग देखील देण्‍यात आला आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी करण्‍यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडला गेला आहे.

***

*गोरेगाव - मुलुंड जोड मार्गवरील (GMLR) उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती :-*

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पूर्व द्रुतगती महामार्गाची पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणी करून पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ व सुरळीत करणे हा आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेलजवळील जंक्शनवर १.२६ किलोमीटर लांबीचा ३ × ३ मार्गिकेचा उड्डाणपूल उभारण्‍यात आला आहे. गोरेगाव (पूर्व) येथील, जनरल अरुणकुमार वैदय मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोष नगर पर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

 या उड्डाणपुलामुळे, गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यान जोडणी तसेच जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक तसेच लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची भौमितिक रचना, अभियांत्रिकी नियोजन आणि बांधकाम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.

उड्डाणपुलाची अधिरचना पूर्व निर्मित बॉक्स आकाराच्या काँक्रीट सेगमेन्टचा वापर करून  उभारण्यात आली आहे. पी ७ ते पी ११ या आधारस्तंभांदरम्यान वक्राकार पोलादी स्पॅनची (स्टील स्ट्रक्चर) संरचना करण्यात आली आहे. जंक्शनच्या गुंतागुंतीच्या भौमितिक रचनेनुसार वक्राकार स्पॅन आणि बहुशाखीय उड्डाणपूल संरचनांचा समावेश आहे. भूस्तर (Geological Strata) स्थितीनुसार पाइल फाउंडेशन तसेच उघड्या प्रकारचे पाया बांधकाम (Open Foundations) करण्यात आले आहे. उतार असलेले पोहोच मार्गदेखील करण्‍यात आले आहेत. जनरल अरुणकुमार वैदय मार्ग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील हा उड्डाणपूल गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलामुळे गोरेगाव पूर्व परिसरातील प्रमुख वाहतूक कोंडी दूर होण्‍यास मदत होणार आहे.   

***

(जसंवि/५५३)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com