ठाण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या प्रदीप पूर्णेकर यांची भर रस्त्यात झालेल्या निर्घृण हत्या तपास प्रक्रियेत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपींची झाडाझडती सुरू असून, मुख्य आरोपी पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया उर्फ टल्ली तसेच अमित उर्फ पपलू यांना आमनेसामने बसवून महत्त्वपूर्ण चौकशी पार पडली. हत्येच्या वेळी वापरण्यात आलेले उर्वरित शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. याशिवाय, हत्या केल्यानंतर आरोपींना शहरातून पळून जाण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी लपून राहण्यासाठी कोणी आर्थिक रसद पुरवली, याबाबतही काही माहिती मिळू शकलेली नाही.
विशेष तपास पथकाच्या (SIT) अधिकाऱ्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार, मुख्य आरोपी पप्या शिंदे हा अद्यापही पोलिसांच्या तपासात अपेक्षित असे सहकार्य करत नाही. त्याने अनेक प्रश्नांवर मौन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दडलेले सत्य उलगडण्यासाठी सर्व संशयितांची एकत्रित आणि समोरासमोर चौकशी करणे प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक बनले होते. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण हत्येसाठी तब्बल दोन पिस्तूल आणि तीन धारदार चॉपरचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना अद्याप त्यापैकी केवळ एकच पिस्तूल हस्तगत करण्यात यश आले आहे. उर्वरित प्राणघातक हत्यारे नेमकी कुठे लपवून ठेवली आहेत आणि या संपूर्ण हत्येचा कट नक्की कुठे शिजला, याचा तपास सुरू आहे.
परंतु या हत्याकांडची तपासणी करणारे प्रमुख अमरसिंग जाधव हे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ताफ्यात ड्यूटी देत आहेत. एका बाजूला न्यायासाठी पीडित कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला तपास अधिकाऱी मंत्री महोदयांची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत जनतेने निष्पक्ष चौकशी होईल याची अपेक्षा कशी करावी असा प्रश्न मानपाड्यातील नागरिक विचारत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट करावी. तपासावर कोणताही राजकीय प्रभाव नाही, हे कृतीतून सिद्ध करावे अशी मागणी आता होत आहे.
दरम्यान या प्रकरणात ज्यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. त्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे याबाबत मात्र आता पोलिसांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. राजेंद्र शिंदे यांना थेट गुन्हे शाखा कार्यालयात बोलावून त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येतील मुख्य संशयित आरोपींसोबत त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याने, या संपूर्ण हत्याकांडामागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा उलगडा लवकरच होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

0 टिप्पण्या