Top Post Ad

फक्त अदानी अपात्र... सर्व धारावीकर पात्र... रखरखत्या उन्हात धारावीकरांचा अदानि विरोधी प्रचंड मोर्चा

धारावीमधील प्रत्येक झोपडपट्टीवासियास 500 चौ. फू.चे घर मिळालेच पाहिजे. याचे लेखी आश्वासन सरकार-अदानी कंपनीने द्यावे यासाठी 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता रखरखत्या उन्हात धारावीकरांनी एक विशाल मोर्चा वांद्रे पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणावर (एसआरए) काढला. अदानी कंपनी विरोधात झोपडपट्टीवासियांमध्ये असंतोष-नाराजी खदखदत आहे. या नाराजीचा स्फोट  धारावी बचाव आंदोलन या संघटनेने काढलेल्या या मोर्चातून होऊ नये यासाठी 300 हून अधिक पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र 'संपूर्ण धारावी पात्र, गौतम अदानी  केवल अपात्र'  घोषणेमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.   

 विधान परिषदेमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, काँग्रेसच्या खासदार वर्षा  गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड  आदींसह धारावी बचाव आंदोलनाचे अनिल शिवराम कासारे, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक जोसेफ कोळी, टी.एम.जगदीश, नगरसेविका अर्चना शिंदे,नगरसेविका हर्षला मोरे, कॉग्रेसच्या नगरसेविका आशा दीपक काळे,नगरसेवक बब्बू  खान, विठ्ठल मोरे,राष्ट्रवादी शपचे धारावीचे अध्यक्ष उलेश गजाकोश,भाकपचे मुंबई  नसरुल हक, माजी नगरसेवक  प्रकाश नकाशे,सपाचे राहूल गायकवाड, असफाक खान, बिजनेस असोसिएशनचे समीर मंगरु,अन्सार शेख,मनसेचे आरिफ शेख,काँग्रेसचे दीपक खंदारे,शकील चौधरी,आपचे राफेल पॉल, शिवसेनेचे शाखाप्रमुख विठ्ठल पवार ,महादेव शिंदे, किरण काळे,आनंद भोसले, मुन्ना शेख, सतिष कटके, मनी कडंन,गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, विठ्ठल पवार, बसपाचे शामलाल जैस्वार, महादेव शिंदे, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले आदींसह धारावीमधील  मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता.   

धारावी कुंभारवाडा येथील हॉटेल बिस्मिल्ला येथून  हा मोर्चा  वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. 35 ते 38 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान रखरखते ऊन असतानाही हा मोर्चा निघाला. 'कोई नही धारावी के बाहर जायेगा, खाली अदानी धारावी के बाहर जायेगा',  'नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी', 'प्रत्येक धारावीकाराला 500 चौरस फुटाचे घर धारावीतच मिळाले पाहिजे', 'पात्र-अपात्रचा खेळ बंद करा', 'सगळे धारावीकर पात्र- अदानी तेवढे  अपात्र ' अशा घोषणा देत  हा मोर्चा शिस्तीने चालत असताना  साहिल हॉटेल चौकात  रस्त्यावर पोलिसांनी हा मोर्चा अडवला. यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले.  
यानंतर अंबादास दानवे यांच्यासह 25 जणांचे  शिष्टमंडळ पोलीस आणि खाजगी वाहनांमधून एसआरए कार्यालयांवर रवाना झाले.  मात्र एसआरए कार्यालयावरही आधीच  आलेल्या मोर्चेकऱयानी कोणत्याही प्रकारे अदानी  विरोधात उद्रेक करू नये यासाठी या ठिकाणीही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता.  
 अनिल देसाई, बाबूराव माने, ज्योती गायकवाड, वर्षा गायकवाड, महेश सावंत,  श्रध्दा जाधव यांनी धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या वतीने एक निवेदन एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. मोर्चातील शिष्टमंडळाचे म्हणणे एसआरएचे प्रमुख महेन्द्र कल्याणकर यांनी ऐकून घेतले. तसेच सदर मागण्याबाबत धारावी बचाव आंदोलन या संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे आश्वासनही कल्याणकर यांनी यावेळी दिले.  

 धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीने धारावीचा एक परिपूर्ण आराखडा-मास्टर प्लॅन बनवावा. हा  मास्टर प्लॅन धारावीच्या चौकाचौकात लावावा. लोकांच्या मोबाईलवर हा प्लॅन व्हाट्सअप वर टाकावा ही जोरदार मागणी खासदार अनिल देसाई यांनी याप्रसंगी   केली. तसेच या प्लॅनवर धारावीकरांना   आपल्या हरकती, सूचना  नोंदवण्यासाठी वेळ द्यावा. आणि सर्व पात्र अपात्र लोकांना धारावीतच 500 चौरस फुटाचे घर द्यावे  या मागणीचा पुनरुच्चारही अनिल देसाई यांनी यावेळी केला.  
आमदार महेश सावंत यावेळी  म्हणाले अदानी समूहाच्या मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने धारावीतील प्रत्येक झोपडपट्टीवासियाबरोबर एग्रीमेंट करावे, करार करावा. तसेच धारावी मेघवाडीत बिल्डिंगचे काम रात्रीही सुरू असते. त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱया लोकांच्या झोपेवर होत असल्याने मेघवाडीतील  रात्रीच्या कामावर बंदी घालावी.  
       आमदार अंबादास दानवे म्हणाले धारावीकरांबरोबर पात्र- अपात्रेच्या खेळ करीत बसू नका. धारावी हे  श्रमिकांचे नगर असून सर्वांनाच या धारावीतच घरे द्या. कोणालाही धारावी बाहेर घर देण्याचे मनात आणू नका. नाही तर  या  विरोधात शिवसेना ठाकरे गट उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.  
 धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने म्हणाले धारावीला  अदानी कंपनीने आपल्या सोयीचे खेळणे बनवले आहे. ज्या जमिनीवर  एसआरए प्रकल्प तेथेच   झोपडपट्टीचा विकास हे सूत्र आहे. पण अदानी आले आणि अजब नियम आले. झोपडपट्टी धारावीत. पण अदानी कंपनीस  जमीन दहिसर,मुलुंड देवणारला  हे विसंगत आहे. जेथे जमीन तेथेच झोपडपट्टीचा विकास हे सूत्र मोडू नका. सर्व पात्र-अपात्र धारावीकरांना घराला घर, दुकानाला दुकान मिळाले  पाहिजे. नाहीतर येथील संतप्त लोक  एकही विट  अदानी कंपनीला येथे रचू देणार नाही असा इशाराही माने यांनी यावेळी दिला.    
अदानी ग्रुप कंपनीतील लोक गुंडगिरी करीत आहेत. ही गुंडगिरी त्वरित थांबवा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली. पूर्वी एफएसआय चार असताना एसआरएमध्ये लोकांना घरे  मिळत होती, आता अदानी कंपनीस घसघशीत बारा एफएसआय मिळालेला आहे. म्हणून त्यांनी धारावीत सर्व पात्र अपात्र लोकांना प्रत्येकी 500 चौरस फूटाचे  घरे द्यावीत अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली.तसेच धारावी मध्ये सध्या अस्तित्वात असलेली सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ही आबाधित राहिली पाहिजे.त्यांना धक्का लागता कामा नये.  
 2011च्या नियमानुसार धारावीकरांना पात्र केले पाहिजे. सर्वांना 500 चौरस फुटाची घरे दिली पाहिजेत. यात कंजूशी करू नये, ही भूमिका हीरहिरीने आमदार ज्योती गायकवाड यांनी मांडली.  
राष्ट्रवादी काँग्रेस शपचे स्थानिक अध्यक्ष उलेश गजाकोश म्हणाले आमच्या मागण्यानुसार प्रत्येक झोपडपट्टीवासियास धारावीतच 500 फुटाचे चौरस फुटाचे घर धारावीतच मिळाले पाहिजे. यासाठी  सरकारने नवीन जीआर काढावा. तर समाज सेवक गणेशभाऊ खेडेकर यांनी पहिल्या माळ्यावर राहणाऱयांना देखील धारावीतच 500 चौ. फुटांचे घर मोफत मिळालेच पाहिजे अशी मागणी करत अदानीच्या दडपशाहीला धारावीकर भिक घालणार नाही असा इशारा दिला.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com