Top Post Ad

धारावीकरांची दैना.... कोणतीही कारवाईची नोटीस न देता डीआरपीने केली रातोरात व्यायामशाळा जमिनदोस्त

धारावीकरांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता सध्या धारावी विकास प्रकल्प सुरू आहे. याचे घडलेले उदाहरण म्हणजे या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून दिनांक 7 जून रोजी थेट एका अधिकृत व्यायामशाळेवरच कारवाईचा बडगा उभारण्यात आला. माजी आमदार बाबुराव माने यांच्या निधीतून पीएमजीपी वसाहतीमध्ये अधिकृतपणे बांधण्यात आलेल्या या व्यायामशाळेला काल डीआरपीने कोणतीही कारवाईची नोटीस न देता रातोरात जमिनदोस्त केले. ही घटना बाबूराव माने यांनी संबंधित लोकप्रतिनिधीना सांगितली असता आमदार मंगेश सावंत आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह धारावी बचाव समितीचे अनिल शिवराम कासारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते  प्रत्यक्ष जागेवर याबाबत शहनिशा करण्यासाठी गेले. मात्र तेथील सुरक्षारक्षकाने गेट लावून घेतले आणि आमदार खासदार यांच्यासह आलेल्या धारावीकरांना देखील आत येण्यास मज्जाव केला. उपस्थित जमाव याबाबत आक्रमक होऊन त्यांनी थेट गेटवरून आत जाऊन गेट उघडला.  त्यानंतर लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना याचा जाब विचारला. मात्र कोणीही उपलब्ध होऊ शकले नसल्याने आमदार सावंत यांनी थेट  उपजिल्हाधिकारी  यांना याबाबत विचारणा केली.  त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही

 सर्वेच्या नावाखाली गुंडांच्या मदतीने स्थानिकांना धमकावले जात आहे. अदानीचे लोक व सरकार हातात हात घालून धारावीकांना हुसकावून लावण्यासाठी काम करत आहे.  महायुती सरकार व त्यांचे बगलबच्चे अदानीची वकिली करतात व धारावीकरांना वाऱ्यावर सोडत आहेत. आता सिंगापूर-हाँगकाँगचे जे गाजर दाखवले आहे ते अदानीचे साम्राज्य उभे करण्यासाठी आहे.   धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या सरकारने मुंबईतील महत्वाच्या जागा अदानीला मोफत दिल्या आहेत. बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, रेल्वेची जमीन, मदर डेअरीची जमीन, मिठी नदीचा परिसर हे सर्व दिले आहे आणि सर्व नियम धाब्यावर बसवून हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हासही केला जात आहे. हे सर्व फक्त आणि फक्त अदानीसाठीच केले जात आहे, असा हल्लाबोल यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. 

धारावी पुनर्वसन प्रकल्प हा धारावीची ओळख पुसून टाकणारा आहे. धारावीकरांना बाहेर हुसकावून लावणे व लाडके उद्योगपती अदानी यांचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प आहे. धारावीकरांना धारावीतच घरे मिळावीत, ज्यांची दुकाने आहेत, उद्योग आहेत, त्यांचे पुनर्वसनही त्याच जागेवर झाले पाहिजे ही मागणी असताना सरकार मात्र अदानीचे लाड पुरवण्यासाठी पात्र अपात्रतेचा खेळ करून हजारो धारावीकरांना धारावी बाहेर पाठवत आहे.  लोकप्रतिनिधींनाही पोलीस व प्रशासन जुमानत नाहीत, उलट उद्धट उत्तरे देऊन कारवाई करण्याची धमकी देतात. अदानीची सुपारी घेऊन  सरकार काम करत आहे. एकीकडे धारावीकरांना त्याच जागेवर घरे व दुकानांना जागा मिळावी यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे पण अदानीसाठी सर्व रान मोकळे आहे. सरकार धारावीच्या विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आताही धारावीचा विकास हाँगकाँग-सिंगापूरच्या धर्तीवर करु ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा म्हणजे केवळ भुलभलैय्या आहे. मोदानीच्या शब्दावर धारावीकरांचा विश्वास नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com