Top Post Ad

प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.         शहरातील विविध भागांत अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. तसेच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमणविरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य व परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वंकष आढावा घेत हा निर्णय घेतला आहे.

           निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.           महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी विनाविलंब हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बदली आदेशाचे पालन न करता नवीन कार्यस्थळी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.           या बदल्यांमुळे प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. तसेच अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना यामुळे गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com