“शिक्षण म्हणजे शाळा - कॅालेज व विद्यापीठांत जाऊन शिकणे” असे खूप जणांना वाटते. शाळेसारख्या संस्थांमध्ये जाऊन शिकणे हा शिक्षणाचा दर्शनीय भाग आहे. शाळेच्या इमारती चांगल्या आहेत का, तिथे फळे आहेत का, मुलीमुलांना बसण्यासाठी बाके आहेत का, पुस्तकपेढीत गरजेनुसार पुस्तके आहेत का, पंखे-खिडक्या व खेळण्यासाठी मैदान आहे का, मुलीमुलांसाठी शौचालयाची स्वतंत्र सोय आहे का, शिक्षकांची संख्या पुरेशी आहे का, विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आर्थिक क्षमता आहे का, हे सगळे प्रश्न या दर्शनीय भागाशी निगडित आहेत. ते अर्थातच महत्त्वाचे आहेत.
या दर्शनी भागाशिवाय, तेवढेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे प्रश्न, शाळा-काॅलेजच्या इमारतीबाहेर सोडवले जातात. शिक्षणाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती, हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे समजले जातात. मुले काय शिकणार व त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, यांची उत्तरे यांवर अवलंबून असतात. आपण काही उदाहरणे घेऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न करुया...
पहिला मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा...१९७५ पर्यंत, आपल्या महाराष्ट्रात ‘११ वी म्हणजे मॅट्रिक’ असा ‘पॅटर्न’ होता. तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षेत 'गणित व इंग्रजी' हे विषय सक्तीचे नव्हते; तर, ऐच्छिक होते. ज्यांना आवड होती, ते विद्यार्थी गणित व इंग्रजी हे विषय घेत व ज्यांना हे विषय आवडत नसे; ते त्याऐवजी, इतर विषय घेऊन मॅट्रिकची परीक्षा देत असत. त्यामुळे, महाराष्ट्रात खूप विद्यार्थी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन पुढे शिकत असत अथवा काही नोकरीधंदा शोधत असत. त्याकाळी, कारकून वगैरे पदासाठी ‘मॅट्रिक पास’ ही उचित अर्हता समजली जात असे. म्हणून अनेक जण ‘क्लेरीकल स्टाफ’ म्हणून आपल्या करीअरची सुरुवात करीत.
पुढे १९७५ सालापासून सरकारने ‘११ वी म्हणजे मॅट्रिक’ हा पॅटर्न बदलला व ‘१० वी म्हणजे मॅट्रिक’ असा नवीन पॅटर्न आणला. विशेष म्हणजे या नवीन पॅटर्नमध्ये इंग्रजी व गणित हे विषय सक्तीचे करुन ‘अभ्यासक्रम बदलला’. मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ, हाच अभ्यासक्रम चालू आहे. अगदी नवीन शैक्षणिक धोरणात देखील सक्तीच्या इंग्रजी व गणिताचा ‘अभ्यासक्रम’ कायम ठेवला आहे.
१९७५ पासून मॅट्रिक परीक्षेत गणित व इंग्रजी सक्ती करण्याचा निर्णय झाला; तेव्हा, समाजात शैक्षणिक अभ्यासक्रम, या विषयाबाबत फारशी जागृती नव्हती. त्यामुळे, याबाबत फारशी चर्चा होत नसे. परिणामी, यावर पटकन अंमलबजावणी झाली. परंतु मागील पन्नास वर्षांत, मॅट्रिक नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पाहणी केल्यास ९०% हून अधिक विद्यार्थी गणित व इंग्रजी यांत अनुत्तीर्ण झाल्याचे दिसून येईल. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षण सोडले...एका अर्थाने दहावीत गणित व इंग्रजी या विषयांची सक्ती करून पंधरा-सोळा वर्षांच्या कोवळ्या विद्यार्थ्यांना जणू शिक्षण-व्यवस्थेबाहेर फेकले गेले. हे विषय सक्तीचे नसते; तर, यातील बरेचसे विद्यार्थी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन निदान कारकून तरी झाले असते. परंतु ‘नॅान मॅट्रिक’ म्हणजे ‘मॅट्रिक नापास’, असा शिक्का बसल्याने, त्यांना साधी कारकुनाची नोकरीदेखील मिळेना. अभ्यासक्रम व त्यातील बदल, हा किती महत्त्वाचा विषय आहे, हे यावरुन आपल्या ध्यानात येऊ शकेल.
अभ्यासक्रमाचे सादरीकरण, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र शिक्षण-मंडळाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता ४ थीच्या इतिहास पुस्तकात शिवरायांचा इतिहास दिला आहे. यात अफजलखान, हा स्वराज्यावर चालून आल्याचे एक प्रकरण आहे. या प्रकरणात 'अफजलखान' म्हणून दाखवलेले एक काल्पनिक चित्र आहे. धिप्पाड व टिपिकल मुस्लीम दाढी असलेले, हे चित्र पाहून चौथीच्या लहान मुलांवर काय मानसिक परिणाम होत असेल? समजा, ही मुले दहावीत अनुत्तीर्ण झाली व त्यांचे शिक्षण अर्धवट सुटले; तरी, *अफजलखानाचे काल्पनिक चित्र ‘अजाणतेपणी’ डोक्यात बसल्याने, अशी मुले मुस्लीमद्वेष करणाऱ्या 'हिंदुत्ववादी' अपप्रचाराला सहजगत्या बळी पडण्याची शक्यता जास्त असू शकते!* आज आपल्या आजुबाजुला मुस्लीम-द्वेषाचे जे वातावरण दिसत आहे; त्याचे मूळ, अभ्यासक्रमाच्या अशा सादरीकरणात आहे. आश्चर्य म्हणजे, याच प्रकरणात *अफजलखानाचा वकील असलेल्या 'कृष्णाजी भास्कर कुलकर्णी' याचा उल्लेख, केवळ ‘कृष्णाजी भास्कर’ अशा शब्दात केला आहे. याच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याने अफजलखान भेटीप्रसंगी झालेल्या झटापटीत शिवरायांवर वार करुन त्यांना जखमी केले होते. परंतु परीक्षेत "अफजलखानाचा वकील कोण होता?" असा प्रश्न सहसा विचारला जात नाही!* यावरुन अभ्यासक्रम आणि त्याचे सादरीकरण, या महत्त्वाच्या विषयाचे दुष्परिणाम किती घातक असतात, हे सर्वांच्या ध्यानात यावे, अशी अपेक्षा आहे.
दुसरा मुद्दा आहे, परीक्षा पद्धतीचा! आपल्या शिक्षण व्यवस्थेत स्मरणशक्तीवर अवाजवी भर दिला जातो. शिक्षण-व्यवस्थेत स्मरणशक्ती हा महत्त्वाचा घटक आहे, हे मान्य! परंतु परीक्षा पद्धती १००% स्मरणशक्तीवर अवलंबून ठेवणे, हे अत्यावश्यक आहे काय? पूर्णतः स्मरणशक्तीवर आधारित, अशा परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थी पाठांतराच्या मागे लागतात. ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, अशी मुले या पद्धतीत पुढे निघून जातात. ही स्मरणशक्ती नेमकी परीक्षेच्या तीन तासात कामाला यायला हवी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर, तुम्हाला परीक्षेच्या वेळेनंतर आठवले तर ‘उत्तर माहित असूनही’ परीक्षेच्या दृष्टीने काहीही उपयोग नाही. म्हणून, निव्वळ १००% स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा-पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे.
परीक्षेतील स्मरणशक्तीचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘ओपन बूक एक्झॅम’ असा एक पर्याय उपलब्ध आहे. यांत क्रमिक पुस्तके बघून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. ही फार सोपी पद्धत आहे, असे काहींना वाटू शकेल. परंतु तसे नाही! पुस्तक बघून परीक्षा द्यायची असेल; तर, विद्यार्थ्यांना प्रथम पुस्तक गंभीरपणे वाचावे लागेल. पुस्तक *“नीट”* वाचले तरच ‘शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला?’ या प्रश्नाचे उत्तर, कोणत्या पानावर आहे, हे समजून येईल. म्हणून, ‘ओपन बुक एक्झॅम’ पद्धती वापरुन, विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्यदेखील सुधारता येईल. ‘असर’ (ASER) अहवालानुसार, इयत्ता ५ वीच्या लक्षणीय विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे मातृभाषेतील पुस्तक वाचता येत नाही, असे आढळले आहे. हे वैगुण्य दूर करण्यासाठी, ही पद्धत उपयुक्त ठरू शकेल !
या पार्श्वभुमीवर, १००% स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा पद्धती ऐवजी ५०% ‘ओपन बूक एक्झॅम’, २५% प्रात्यक्षिके व तोंडी परीक्षा आणि २५% स्मरणशक्ती अशी परीक्षा पद्धती अवलंबिली तर, काहीसा समतोल साधला जाईल !
सबब, अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती, हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षण-व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी याचा उपयोग करणे आवश्यक आहे. सध्याच्या शैक्षणिक आंदोलनाच्या निमित्ताने हे महत्त्वाचे विषय पालकांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नव्हे; तर, प्रचलित शिक्षणव्यवस्थेत असे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. शिक्षणव्यवस्थेचा एवढ्या बारकाईने विचार केला तरच सध्याचे आंदोलन सार्थकी लागेल...अन्यथा, विद्यार्थ्यांनी सांडवलेले रक्त, वाया जाऊ शकते!
शुद्धोदन आहेर
(२४ जुलै-२०२६)
0 टिप्पण्या