विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या व विद्यार्थी व विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही राजकारभार करत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्या भाजपाने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ असा प्रकार असून भाजपा, नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा खरा चेहरा देशातील जनतेने ओळखला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गरळ ओकून भाजपाला आपले महापाप लपवता येणार नाही, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई भाजपाचा अध्यक्ष अमित साटम हा इसम अत्यंत विकृत मानसिकतेचा आहे, हे त्याच्या आधीच्या अनेक प्रकरणातून त्याने दाखवून दिले आहे. सामान्य जनेतला अत्यंत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणारे व्हिडीओ मुंबकरांनी पाहिले आहेत. मुंबईत अतिवृष्टी व बीएमच्या भोंगळ कारभारामुळे झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा तर एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला, त्यावर हा इसम फिदीफिदी हसत असताना जगाने पाहिले आहे. आज या इसमाने राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना गांधी नेहरुंचा वारसा आहे, सर्वात जुन्या पक्षाचे ते नेते आहेत तसेच त्यांचे उच्च शिक्षण झाले असून ते सुसंस्कृत आहेत, अमित साटम सारख्या टिनपाट व्यक्तीची त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी भाजपा सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला का केला, मुलींचे कपडे फाडले, अमानुष अत्याचार केले, त्याचे उत्तर द्यावे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांना साथ देणाऱ्या RSSच्या दावणीतील अमित साटमने काँग्रेस व राहुल गांधी यांना देशभक्ती शिकवू नये, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.NEET पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत असून सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा त्यांना हक्क आहे पण काही पोलीस जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत, धमक्या देत आहेत. मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावले जात आहे, " जर तुम्ही मला इथे परत सापडलात, तर मी तुमच्या प्रत्येकाच्या खिशात ५० ग्रॅम पावडर (ड्रग्ज) ठेवीन, मग तुम्ही आयुष्यभरासाठी गायब व्हाल, माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!" अशी धमकी एक पोलीस देत आहे. ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे. या पोलिसाने आतापर्यंत किती निष्पाप लोकांना धमक्या देऊन त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे, किती लोकांना खोट्या गुन्ह्यात फसवले आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांनी याची तातडीने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..

0 टिप्पण्या