आषाढ पौर्णिमेपासून प्रारंभ होणारा वर्षावास हा बौद्ध धम्मातील अत्यंत पवित्र, अनुशासनपूर्ण आणि साधनामय कालखंड मानला जातो. या पवित्र पर्वाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर वर्षावास 2026 धम्म संकल्प या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 जुलै पासून आगामी तीन महिने हे अभियान राज्यभरात राबविले जाणार आहे.
वर्षावास म्हणजे पावसाळ्यात भिक्खू संघाने एका विहारात स्थिर राहून धम्म अध्ययन, ध्यान, शील, साधना आणि आत्मविकासासाठी स्वतःला समर्पित करणे होय. भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर आपल्या जीवनात तब्बल ४५ वर्षावास पूर्ण करून धम्म, करुणा, प्रज्ञा आणि समतेचा संदेश संपूर्ण मानवजातीला दिला.
वर्षावास हा केवळ भिक्खू संघापुरता मर्यादित नसून प्रत्येक उपासक - उपासिकेंसाठी आत्मपरीक्षण, आत्मशुद्धी आणि धम्ममय जीवनाचा संकल्प करण्याचा सुवर्णकाळ आहे. या काळात पंचशील, अष्टशील, त्रिशरण, उपोसथ, सूत्रपठण, ध्यानभावना आणि धम्म अभ्यास यांचा अंगीकार करून नैतिक, संयमी आणि करुणामय जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
या धम्म संकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध बुद्ध विहारांमधून धम्म देसना, महाबुद्ध वंदना, चिवरदान सोहळे, विशेष मुलाखती, धम्म चर्चासत्रे आणि वर्षावासाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे चित्रीकरण व थेट प्रसारण केले जाणार आहे. या माध्यमातून वर्षावासाचे तत्त्वज्ञान आणि बौद्ध धम्माचा मानवतावादी संदेश अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा लॉर्ड बुद्धा टिवीचा प्रयत्न आहे.
समाजात शांती, समता, बंधुभाव, नैतिकता आणि करुणेची मूल्ये दृढ करण्यासाठी सर्व बौद्ध बांधव तसेच नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि वर्षावासाच्या पवित्र काळाचा लाभ घ्यावा असे आवाहन लॉर्ड बुद्धा टीवीचे संचालक सचिन मून यांनी केले आहे.

0 टिप्पण्या