धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 'कृतज्ञता गौरव सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील नेहरू सेंटर येथे पार पडणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पाठक आणि कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
मागील शंभर वर्षांपासून इतिहास संशोधन, दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संवर्धन आणि ग्रंथप्रकाशनाचे कार्य करणाऱ्या राजवाडे संशोधन मंडळाच्या वाटचालीत शरद पवार यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांचा गौरव करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंडित पन्नालाल घोष तसेच इतिहासप्रेमी अब्दुल मजीद झकेरिया यांच्या संग्रहातील दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे राजवाडे संशोधन मंडळाकडे हस्तांतरण होणार आहे.
यावेळी 'छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयी मोहिमा' या ग्रंथाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 'खानदेश वैभव' या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, तर 'शिल्पकार राम सुतार' या संशोधक विशेषांकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, शोभा बच्छाव, आमदार जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अमरीश पटेल, सत्यजित तांबे, अनुप अग्रवाल, राम भदाणे, मंजुळा गावित, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना प्रा. प्रकाश पाठक आणि संजय मुंदडा यांनी सांगितले की, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी उभारलेल्या इतिहास संशोधनाच्या परंपरेला पुढे नेत राजवाडे संशोधन मंडळाने शतकभर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन केले आहे. या शताब्दी वर्षात इतिहासाच्या या समृद्ध परंपरेला अभिवादन करताना संस्थेच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पाठक, कार्याध्यक्ष संजय मुंदडा, स्वागताध्यक्ष अशोक जैन तसेच स्वागत समिती सदस्य नितीन न्याती, महेंद्र काबरा आणि डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

0 टिप्पण्या