CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नॉन-ॲलोपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय केवळ माननीय न्यायालयानेच घ्यावा, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी, सचिव डॉ विक्रांत देसाई व डॉ अमोल गीते यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात मांडली.पत्रकार परिषदेत डॉ.कुलकर्णी IMA ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेचा पूर्ण आदर असून न्यायालयाच्या निर्णयाचे शब्दशः पालन करण्यास संघटना कटिबद्ध आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी कोणतीही नोंदणी प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात पदांच्या कमतरतेमुळे एमबीबीएस पदवीधरांचा बॉण्ड रद्द करून नवीन भरती थांबविण्यात आली आहे. साडेपाच वर्षांचे शिक्षण, इंटर्नशिप आणि १९ विषयांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच एमबीबीएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी मिळते. मात्र, केवळ एका विषयाचा एक वर्षाचा अर्धवेळ CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नॉन-ॲलोपॅथिक डॉक्टरांना त्याच स्वरूपाची नोंदणी देणे योग्य ठरणार नाही, असा सवाल IMA ने उपस्थित केला आहे.IMA च्या म्हणण्यानुसार, हा अभ्यासक्रम केवळ शनिवार आणि रविवारी घेतला जात असल्याने सुट्ट्यांचा विचार करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा कालावधी सुमारे ९० दिवसांपर्यंतच मर्यादित राहतो. अशा अल्पकालीन प्रशिक्षणाच्या आधारे कोणतीही व्यक्ती सर्व प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सक्षम होईल, असे मानणे अवास्तव असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. IMA ने सरकारच्या सर्व विधायक व जनहिताच्या निर्णयांना नेहमीच पाठिंबा दिल्याचे नमूद करत, न्यायालयाचा निकाल पुढील १५ दिवसांत अपेक्षित असल्याने तो येईपर्यंत CCMP नोंदणी प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभरातील डॉक्टरांना सेवा मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या निवेदनावर IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, मानद सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि मानद खजिनदार डॉ. अमोल गिट्टे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या