आज २७ ऑगस्ट, हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर पार्श्वगायक मुकेश यांचा स्मृतिदिन. आपल्या दर्दभऱ्या, भावस्पर्शी आणि मनाला भिडणाऱ्या आवाजाने तीन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मुकेश आजही आपल्या स्वरांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या निधनाला अनेक दशके उलटली, तरी त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. २२ जुलै १९२३ रोजी दिल्ली येथे मुकेश यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर असे होते. त्यांचे बालपण दिल्लीतील दारियागंज आणि चांदणी चौक परिसरात गेले. त्यांचे वडील जोरावर चंद माथुर हे अभियंता होते, तर आई राणी या गृहिणी होत्या. मुकेश यांना लहानपणापासूनच संगीताची विशेष आवड होती. त्या काळातील महान गायक कुंदनलाल सहगल यांचे ते निस्सीम चाहते होते. सहगल यांच्याप्रमाणेच अभिनेता आणि गायक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले.
मुकेश यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना त्यांच्या एका नातेवाइकाच्या लग्नात घडली. त्या वेळी प्रसिद्ध अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांना गाताना ऐकले. त्यांच्या आवाजाने मोतीलाल इतके प्रभावित झाले की, या तरुणाचा आवाज भविष्यात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख निर्माण करेल, असा त्यांना विश्वास वाटला. त्यांनी मुकेश यांना मुंबईत आणले आणि गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे पाठवले. मुकेश यांना अभिनयाचीही आवड होती. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना काही चित्रपटांमध्ये अभिनयाच्या संधी मिळाल्या. १९४१ मध्ये ‘निर्दोष’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतरही त्यांनी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या; मात्र अभिनय क्षेत्रात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे नायक होण्याचे स्वप्न बाजूला ठेवून त्यांनी आपले संपूर्ण लक्ष गायनाकडे केंद्रित केले.१९४५ मध्ये ‘पहली नजर’ या चित्रपटातून मुकेश यांना पार्श्वगायक म्हणून मोठी संधी मिळाली. या चित्रपटातील ‘दिल जलता है तो जलने दो’ हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले. या गाण्यावर कुंदनलाल सहगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव जाणवत होता. मात्र मुकेश यांनी पुढे स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यहूदी’ चित्रपटातील ‘ये मेरा दीवानापन है’ या गीताने मुकेश यांच्या गायकीला नवी दिशा दिली. या गीतातून त्यांचा स्वतंत्र, भावपूर्ण आणि दर्दभरा आवाज रसिकांसमोर ठळकपणे आला. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीने वेग घेतला. ‘मेला’, ‘अंदाज’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या गीतांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.
मुकेश आणि राज कपूर यांचे नाते हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अजरामर पर्व आहे. राज कपूर यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला मुकेश यांच्या आवाजाने एक वेगळी भावनिक ओळख मिळवून दिली. ‘आग’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘परवरिश’, ‘अनाडी’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ अशा अनेक चित्रपटांतील गाणी लोकप्रिय झाली. त्यामुळे ‘राज कपूर यांचा आवाज’ अशी मुकेश यांची ओळख निर्माण झाली. मुकेश यांच्या आवाजाची खासियत म्हणजे त्यातील नैसर्गिक भावुकता. त्यांच्या आवाजात कृत्रिमता नव्हती. प्रेम, विरह, दुःख, एकाकीपणा, आशा आणि जीवनातील संघर्ष या भावना ते अत्यंत सहजतेने व्यक्त करीत. त्यामुळे त्यांचे गीत ऐकताना ते केवळ गाणे ऐकत असल्याची भावना होत नसे, तर एखादी हृदयस्पर्शी कथा आपल्या मनासमोर उलगडत असल्याचा अनुभव येत असे.
मुकेश यांनी हिंदी चित्रपटसंगीताला असंख्य अविस्मरणीय गीते दिली. ‘दोस्त दोस्त ना रहा’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’, ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’, ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ यांसारख्या त्यांच्या गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या स्वरांमध्ये जीवनातील वेदना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद होती. म्हणूनच त्यांना ‘दर्दभरा आवाज’ अशी ओळख मिळाली. १९७६ मध्ये राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटासाठी गाण्याचे ध्वनिमुद्रण करून मुकेश अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. २७ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिकेतील डेट्रॉईट येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज कपूर यांनी, “आज माझा आवाज कायमचा हरपला,” अशी हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिली. मुकेश यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक महान पार्श्वगायक गमावला.
मुकेश यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. ‘रजनीगंधा’ चित्रपटातील ‘कई बार यूँ ही देखा है’ या गीतासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र पुरस्कारांपेक्षाही आपल्या चाहत्यांच्या हृदयात मिळालेले स्थान हेच त्यांच्या कलेचे खरे यश होते. मुकेश यांचा आवाज हा केवळ एक स्वर नव्हता; तो भावनांचा स्पर्श होता. त्यांच्या गाण्यांमधून व्यक्त होणारा दर्द, प्रेम आणि जीवनाचे तत्त्वज्ञान आजही रसिकांना अंतर्मुख करते. काळ बदलला, संगीताच्या शैली बदलल्या, तंत्रज्ञान बदलले; परंतु मुकेश यांच्या स्वरांची मोहिनी मात्र आजही कायम आहे. काही गायक काळाच्या ओघात विस्मृतीत जातात; पण काही स्वर काळावर मात करून अजरामर होतात. मुकेश हे अशाच अजरामर स्वरांचे गायक होते. त्यांच्या आवाजात भारतीय मनातील सुख-दुःख, प्रेम-विरह आणि जीवनातील असंख्य भावनांचे प्रतिबिंब उमटले होते. म्हणूनच मुकेश आज आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज प्रत्येक पिढीला पुन्हा पुन्हा आपलासा वाटतो.
अजरामर स्वरांना मृत्यू नसतो; ते गीतांच्या रूपाने सदैव जिवंत राहतात.
स्मृतिदिनी या महान, अजरामर पार्श्वगायक मुकेश यांना भावपूर्ण आदरांजली!
- श्याम ठाणेदार
- दौंड, जिल्हा पुणे

0 टिप्पण्या