Top Post Ad

Nashik कुंभमेळ्याचा ३४ हजार ७३२ कोटींचा विकास आराखडा

नाशिक कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आरखड्यातील कामांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या  बैठकीत १२ कोटी भाविकांच्या सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा याबाबत सविस्तर नियोजन सादर करण्यात आले,  कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हजारो तात्पुरती शौचालये, कचराकुंड्या, बदल खोल्या आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके, स्वयंसेवक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे. भूसंपादन, रिंग रोड, साधुग्राम आणि इतर महत्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून एप्रिल २०२७ मध्ये प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश तसेच केंद्र व राज्य शासन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करून सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, भव्य आणि भाविकांसाठी संस्मरणीय करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

 मुख्यमंत्री पुढे म्हणाले,  नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित असून, सर्व विभागांनी विकास आरखड्यातील कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत. कामे पुढे ढकलण्याची वृत्ती दूर करुन कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आरखड्यातील कामांना गती द्यावी, सध्याची कुंभमेळ्यातील कामांची परिस्थिती समाधानकारक नसून प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीपर्यंत कामामध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे. त्यामुळे पुढील बैठकीची तयारी आजपासूनच सुरू करावी.विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडता कामा नये. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण करावी.

निर्धारित वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. विकास कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी.महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महानगरपालिकेशी  समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची  कामे तातडीने पूर्ण करावीत. सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, सर्व विभागांनी वेळबद्ध नियोजन, परस्पर समन्वय आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे तसेच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेस तसेच विस्तृत पार्किंग व्यवस्थेची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.  'डिजिटल कुंभ' संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, 'कुंभदूत' एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे  सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यासह नाशिकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान नाशिक कुंभमेळ्यात 500 कोटींचा वर्कऑर्डर घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केला. याला  "कुंभमेळा प्राधिकरण आणि मंत्र्याची समिती जबाबदार असल्याचेही ते म्हणाले, तर  आमदार अनिल परब यांनी कुंभमेळ्यातील रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. याबाबत उत्तर देतांना  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदा प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचाराची व उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाईल. तसेच सर्व नियम व निर्धारित प्रक्रियेचे पालन झाले आहे का, याची पडताळणी करून दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा  विधान परिषदेत नियम ६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना भोसले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com