चिपळूण येथील AHA हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांची फसवणूक, अनियमितता, मान्यता व प्रशासकीय गैरकारभारासंदर्भात गंभीर तक्रारी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेची मान्यता, संलग्नता, शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व सुरक्षेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित बि. आदमाने यांच्यासह चक्रिय भारतचे संपादक सचिन येरम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासंदर्भात रोहित बि. आदमाने [प्लॉट नं- ६८४, गट नं १३४, भारतमाता कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर ४३१००१. (संपर्क : ७७४३८४४०१४) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी संबंधित संस्थेच्या मान्यता व संलग्नतेची पडताळणी तसेच संस्थेच्या कारभाराची तातडीने तपासणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, संस्थेचे संचालक ललित काशिनाथ कांडवेळकर आणि रोहिणी दीपक ओतारी हे 'नवयुग विद्यापीठा'शी संबंधित कागदपत्रांचा वापर करून महाविद्यालय चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित विद्यापीठाची मान्यता, परवानगी आणि कागदपत्रे कायदेशीर व वैध आहेत का, याची अधिकृत यंत्रणेमार्फत सखोल पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या मार्केटिंगसंदर्भात राज प्रशांत सरोदे यांच्यामार्फत सोशल मीडियावर जाहिराती केल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या जाहिरातींमध्ये करण्यात येणारे दावे प्रत्यक्ष परिस्थितीशी सुसंगत आहेत का आणि ते शासनमान्य नियमांचे पालन करतात का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी असलेल्या वसतिगृहाची अवस्था दयनीय असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सुरक्षा, स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि अग्निसुरक्षा यासंदर्भातील नियमांचे पालन होते की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अधीक्षक संजय अनंत जाधव यांच्याकडून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असून, त्यांच्या कारभारात काही त्रुटी असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
1. AHA हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची विद्यापीठीय मान्यता, संलग्नता व आवश्यक परवानग्यांची तातडीने प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी. 2. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची स्थिती, सुरक्षा, स्वच्छता, आहाराचा दर्जा व अग्निसुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. 3. चौकशीत गैरव्यवहार, फसवणूक किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित संचालक, अधिकारी व संस्थेविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. 4. चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात. या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तक्रारदाराने निवेदनासोबत विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारींच्या प्रती, पालक व विद्यार्थ्यांना दिलेल्या कथित धमक्यांच्या ऑडिओ क्लिप्स तसेच महाविद्यालयातील कथित अनियमिततेशी संबंधित कागदपत्रे व छायाचित्रे पुराव्यादाखल जोडल्याचे नमूद केले असून तातडीने वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.

0 टिप्पण्या