Top Post Ad

Bestच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह; बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’चा एल्गार!

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने बेस्टच्या पुनरुत्थानासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांची घटती संख्या, कंत्राटी बसगाड्यांवरील वाढते अवलंबित्व, मनुष्यबळातील कपात आणि कंत्राटीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे बेस्टच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.बेस्ट उपक्रमाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी ती हळूहळू कंत्राटी पद्धतीवर अवलंबून होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. बसगाड्यांपासून मनुष्यबळ आणि तिकीट प्रणालीपर्यंत वाढत असलेले कंत्राटीकरण बेस्टला भविष्यात शंभर टक्के कंत्राटीकरणाच्या दिशेने घेऊन जाणार आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांची गरज मान्य असली तरी इलेक्ट्रिक बसच्या नावाखाली बेस्टच्या स्वमालकीचा ताफा कमी करून कंत्राटी बसगाड्यांवरील अवलंबित्व वाढवणे योग्य आहे का, याचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तसेच कंत्राटी तिकीट प्रणालीचा बेस्टच्या महसूल व्यवस्थापनावर, कर्मचाऱ्यांवर आणि प्रवाशांच्या सेवांवर होणारा परिणामही तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. बेस्टच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने अधिक ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ने म्हटले आहे. बेस्टला केवळ आर्थिक तूट असलेला उपक्रम न मानता मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग म्हणून पाहण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बेस्टच्या २२ आगारांच्या पुनर्विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. या पुनर्विकासातून बेस्टला प्रत्यक्षात किती आणि किती काळासाठी आर्थिक फायदा मिळणार, तसेच त्याचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार, याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. बेस्टच्या पुनरुत्थानासाठी स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा वाढविणे, आवश्यक मनुष्यबळाची भरती करणे, कंत्राटीकरणावरील अवलंबित्व कमी करणे, केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवणे आणि तिकीटेत्तर महसूल मोठ्या प्रमाणात वाढविणे, या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेस्टकडे असलेल्या मालमत्ता, आगारे, बसथांबे, जाहिरात माध्यमे आणि इतर व्यावसायिक संधींचा योग्य वापर करून तिकीट दरवाढीऐवजी तिकीटेत्तर महसूल वाढविण्यावर भर दिल्यास बेस्टची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे. ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’च्या वतीने बेस्टच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असून, बेस्ट ही केवळ बससेवा नसून मुंबईकरांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे बेस्टचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवून तिचे आर्थिक आणि प्रशासकीय पुनरुत्थान करण्यासाठी शासन, प्रशासन आणि मुंबईकरांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. “बेस्ट वाचली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे आणि मुंबईकरांच्या सेवेत कायम राहिली पाहिजे,” अशी ठाम भूमिका ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com