' स्वातंत्र्यवादी ' आणि ' सुधारणावादी ' या दोन मत प्रवाहांतील नेत्यांमध्ये शत्रुत्व होते, असा गैरसमज बळकट झालेला आहे. त्या काळाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आला आहे, असे सांगतानाच टिळक - आगरकर या दोघांना एका प्रकरणात महात्मा फुले यांनी मिळवून दिलेला जामीन आजच्या काळातील हिशेबाने तब्बल ६ कोटींचा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी केले.
शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्त त्यांच्यावर राज्यातील. शाळा - कॉलेजांत २०१ व्याख्यानांचा धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. त्यात पवई फिल्टरपाडा येथील मिलिंद हायस्कूलमध्ये दुसरे व्याख्यान देताना सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भवानी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदानंद रावराणे होते. तर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, १८८२ मध्ये कोल्हापूर संस्थानाचे दिवाण महादेव बर्वे यांनी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर मानहानीचा खटला भरण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना डोंगरी येथील तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षा झाली होती. त्यावेळी त्या दोघांना जामिनावर सोडवण्यासाठी जोतिराव फुलेंनी त्यांचे सत्यशोधक सहकारी उद्योगपती रामूशेठ उरवणे यांच्या मार्फत दहा हजारचा जामीन मिळवून दिला होता. इतकेच नव्हे तर, देऊन टिळक - आगरकर यांचा जाहीर सत्कार करत त्यांची पाठराखण केली होती.
कोल्हापूर गादीचे वारस चौथे शिवाजी महाराज यांना ब्रिटिशांनी अहमदनगरच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते. कोल्हापूर संस्थानाचे कारभारी (दिवाण) बर्वे हे ब्रिटिशधार्जिणे असल्याने ते शिवाजी महाराजांना वेडे ठरवण्याचा आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा संशय तत्कालीन समाजात पसरला होता. त्यावरून टिळक आणि आगरकर यांनी 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्रांतून बर्वे यांच्यावर कडक शब्दांत आसूड ओढले होते. त्याबद्दल त्यांना मानहानीच्या खटल्याला आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागले होते, असे किरण सोनवणे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले हे कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नव्हते. धर्माचा आधार घेऊन सर्वसामान्य जनतेचे शोषण, छळ व लुबाडणूक करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला, असे सांगून ते म्हणाले की, समाजातील दुर्बल, वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले,
*डॉ. आंबेडकर यांचे मदतगार ' फुलेवादी '*बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारे मदतगार ' फुलेवादी ' होते, असे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले यांना आपले गुरू मानलेल्या डॉ. आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर समता संगर पेटवले, ते वर्ष फुले यांच्या जन्म शताब्दीचे होते, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
*१ लाख विद्यार्थ्यांपर्यंत फुले विचार पोहचवण्याचा संकल्प*
महात्मा फुले यांच्यावर राज्यातील २०१ शाळा - महाविद्यालयांमध्ये व्याख्याने व शिक्षकांशी संवाद असा उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याद्वारे १० हजार शिक्षक आणि १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत फुले यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार पोहोचविण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न आहे, असे शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

0 टिप्पण्या