राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली ठाणे येथील कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवार, ३ ऑक्टोबर आणि रविवार, ४ ऑक्टोबर या काळात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे ५८वे वर्ष आहे. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालय अशा दोन गटात होणार असून विजेत्यांसाठी एकूण ४४ हजार रुपयांची पारितोषिके आहेत.
नियोजित विषय (०८ मिनिटे) आणि आयत्या वेळचा विषय (०३ मिनिटे) अशा दोन भागात ही स्पर्धा होते. पदवी गटासाठी नियोजित वक्तृत्वाकरता, फुटणारे पेपर आणि विद्यार्थी आंदोलनाचे बदलते आयाम, मक्का संरक्षण कराराचे भारतावरील संभाव्य परिणाम, महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत, आशा भोसले व सुमन कल्याणपूर – मलमली स्वरांचे चांदणे, विकासाची हाव आणि पर्यावरणावर घाव, उत्तेजकांच्या विळख्यातील भारतीय क्रीडाविश्व हे विषय आहेत. तर, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा उदय – एक नवीन आव्हान, आजची सामाजिक स्थिती व अंधश्रध्दा निर्मूलनाची वाढती गरज, शैक्षणिक जीवनातील प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा बंद पडत आहेत!, माझा आवडता निसर्गकवी, क्रीडा क्षेत्रातील भारताची बलस्थाने, वाढते शहरीकरण – विकास की विनाश ? असे विषय आहेत.दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. प्रथम क्रमांकास ८,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ६,००० रुपये, तृतीय क्रमांकास ४,००० रुपये तर उत्तेजनार्थ २,००० रुपये अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक गटात एका महाविद्यालयास पाच विद्यार्थी पाठवता येतील. दोन्ही प्रकारच्या वक्तृत्वात भाग घेणाऱ्या स्पर्धकांचाच पारितोषिकांसाठी विचार केला जाईल. शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे ही स्पर्धा शनिवार, ०३ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होईल. तर पारितोषिक वितरण समारंभ रविवार, ०४ ऑक्टोबर रोजी दु. ४.३० वाजता होईल. ठाणे आणि मुंबईबाहेरच्या स्पर्धकांना विनामूल्य निवासव्यवस्था आणि प्रवास खर्च देण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस श्री. योगेश भालेराव यांनी दिली.
स्पर्धेविषयी अधिक माहिती व अर्जासाठी श्री समर्थ सेवक मंडळ (९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७, ८८७९६३०६२४, ssmthane@gmail.com ) येथे संपर्क साधावा. असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.

0 टिप्पण्या