गणेशोत्सवातील कचऱ्याचे शाश्वत व शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयाने अभिनव ‘प्रसाद ते ऊर्जा’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मंडळाच्या प्रसाद कक्ष व अन्नछत्रामधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येणार आहे.गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या प्रसाद वितरण आणि भोजन सुविधांमधून दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन अन्न व जैविक कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या कचऱ्याचे निर्मितीस्थळी योग्य विलगीकरण करून, समर्पित वाहनांद्वारे तो महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय आणि शीव रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे २ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. या उपक्रमांतर्गत ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७ हजार ७४४ युनिट नवीकरणीय वीज निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्ष वीज निर्मिती ही विलगीकृत कचऱ्याचे प्रमाण व गुणवत्ता तसेच प्रकल्पांच्या कार्यस्थितीवर अवलंबून राहील. निर्माण होणारी वीज रुग्णालयांतील रुग्ण कक्ष, मार्गिका आणि अन्य सामायिक परिसरातील प्रकाशव्यवस्थेसह योग्य कामांसाठी वापरण्यात येणार आहे.हा उपक्रम उप आयुक्त (परिमंडळ-२) आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या निर्देशानुसार तसेच एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेली मेसर्स एरोकेअर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था या प्रकल्पांचे परिचालन व देखभाल करीत आहे. मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त ऊर्जा निर्माण करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक कचरा विल्हेवाट व्यवस्थेवरील भार कमी होऊन चक्रीय अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेलाही चालना मिळणार आहे.
0 टिप्पण्या