Top Post Ad

Maratha आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा स्वतःच्या विकासाकडे अधिक लक्ष’... अजय महाराज बारस्कर

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी समाजाच्या भावनांचा विचार करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन अजय महाराज बारस्कर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला मराठा समाजाशी संबंधित कार्यकर्ते उपस्थित होते.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका आम्हालाही मान्य आहे. मात्र, आरक्षणाच्या मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित होऊन इतर बाबींना अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला. समाजाच्या नावावर आंदोलन उभे करून स्वतःचा विकास साधण्याऐवजी मराठा समाजाच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांना उद्देशून बारस्कर म्हणाले की, “समाजाने ज्याला पुढे केले आहे, त्याच्या मागे समाजाने बसायचे की नाही, हे समाजाने ठरवले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या मागे आंधळेपणाने जाण्यापेक्षा समाजाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे.” आंदोलनाच्या नावाखाली समाजातील लोकांकडून पैसे जमा केले जात असल्यास त्याबाबत पारदर्शकता असली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बारस्कर यांनी राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेवरही भाष्य केले. आरक्षणाच्या प्रश्नात घोटाळा झाला असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे. हा घोटाळा सरकारमधील व्यक्तींनी केला की विरोधकांनी, याचा तपास करून सत्य समाजासमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. “मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवला पाहिजे. आंदोलन, उपोषण आणि संघर्ष यापेक्षा सरकारवर कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने दबाव आणणे अधिक परिणामकारक ठरू शकते,” असे बारस्कर यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पुढील भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलनामुळे समाजात तणाव निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्रातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, जळगाव येथे सुरू असलेले उपोषण सोडून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे बारस्कर यांनी सांगितले. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही टीका केली. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रामाणिकपणे आणि कायदेशीर चौकटीत सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “मराठा समाजाच्या प्रश्नावर खरोखर काम करायचे असेल तर समाजाला विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने निर्णय घ्यावा. केवळ आंदोलन आणि घोषणांमुळे प्रश्न सुटणार नाही,” असेही अजय महाराज बारस्कर यांनी स्पष्ट केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com