श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. यावेळी २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन स्थळांवर १,१९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी १ हजार १३२ जीवरक्षक तैनात असून, ६ हजार ५२ फ्लडलाईट/सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी ४९८ निर्माल्य कलश आणि ३२६ निर्माल्य डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन स्थळांवर २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत.भाविकांच्या सुविधेसाठी ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे तसेच आवश्यक प्रकाशयोजना व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ६ फूट उंचीपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक असून, त्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. आगमन व विसर्जन मार्गावरील ५०६ रस्त्यांवरील ४,२७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्स दुरुस्त करण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावरील २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या असून ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटी येथे १२ कृत्रिम तलाव, २० निरीक्षण मनोरे, २२ तराफे, ९० प्रसाधनगृहे आणि २,००० मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. येथे १ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३ रुग्णवाहिका, ५४८ फ्लडलाईट आणि ११ सर्चलाईटची व्यवस्था, समन्वय कक्ष, पार्किंग व्यवस्था, शामियाना तयार करण्यात आला आहे.
मूर्तिकारांना आतापर्यंत ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली असून, यंदा २५,४०० लिटर पर्यावरणपूरक रंगही विनामूल्य देण्यात आले आहेत.
समुद्रकिनारी ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ व ‘स्टिंग रे’चा वावर लक्षात घेता, नागरिकांनी समुद्रात उतरताना खबरदारी घेऊन महानगरपालिका व पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे; यात प्रथमोपचार व CPRचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. यंदा ७२५ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्वंकष सुविधा व आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष (Emergency Management Control Room) कार्यरत करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या कक्षाद्वारे संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधता येणार आहे. या कक्षात महानगरपालिका मुख्यालयाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बेस्ट (विद्युत पुरवठा), मुंबई पोलिस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांचे अधिकारी तसेच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे हॅम चालक समन्वययाकरिता उपस्थित राहणार आहेत. समन्वय व संदेशवहनाकरिता या नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी, डिजीटल मोबाईल रेडीओ (बिनतारी यंत्रणा), हॅम रेडीओ यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात आतापर्यंत एकूण १ लाख ६३ हजार ३८६ इतक्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये दीड दिवसाच्या उत्सवात २९३ सार्वजनिक, ६२ हजार ९२७ घरगुती, ९२ हरतालिका असे एकूण ६३ हजार ३१२ मूर्ती विसर्जन झाले. पाच दिवसाच्या उत्सवात १ हजार ०२० सार्वजनिक, ३५ हजार ८४३ घरगुती, १२९ हरतालिका असे एकूण ३६ हजार ९९२ मूर्ती विसर्जन झाले. सहा दिवसाच्या उत्सवात (गौरी गणपती) ३०५ सार्वजनिक, ३८ हजार ४३८ घरगुती, ५ हजार ५१८ गौरी असे एकूण ४४ हजार २६१ मूर्ती विसर्जन झाले. सात दिवसाच्या उत्सवात १ हजार ७७८ सार्वजनिक, १६ हजार ६०६ घरगुती, ४३७ गौरी असे एकूण १८ हजार ८२१ मूर्ती विसर्जन झाले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱया श्रीगणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली आहे.

0 टिप्पण्या