Top Post Ad

Mumbai एशियाटिक सोसायटीत ऐतिहासिक प्रदर्शन... भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ

 मुंबईतील टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच  एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आणि इतर कार्यकारिणी  उपस्थित होती. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिकच्या बळकटीकरणासाठी 50 लाख रुपयांची मदत केली, याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच दुर्मिळ ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 1300 दुर्मिळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा 1788 मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा 1870 मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे असे हे प्रदर्शन होते.

यावेळी   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,  भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा,  राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे आहे. इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्राची अस्मिता कधीही नष्ट होत नाही.  भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करावे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे. तसेच ‘ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेल्या ग्रंथसंपदेच्या घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी आहे.  सोसायटीच्या मुख्य कार्याला अधिक बळ मिळावे, तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना आवश्यक ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक मदत केली जाईल,  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एशियाटिक सोसायटीचा 222 वर्षांचा गौरवशाली वारसा आहे. प्राचीन ग्रंथ, पांडुलिपी व नाणी यांचे जतन भावी पिढ्यांसाठी आवश्यक असून या वारशाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले.  एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. आभार सचिव विनय गणपुले यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com