डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्यू. सो.च्या माध्यमातून वडाळा दादर येथे कॉलेज उभे केले. भव्य वसतिगृह बांधले. अनेक विद्यार्थी येथे ऍडमिशन घेऊन आणि वसतिगृहात राहून फुकटात मोठे झाले. या फुकट्यांनी ज्या कॉलेजच्या सावलीत राहून यश प्राप्त केले. त्याच लोकांनी मोडकळीस आलेल्या वसतिगृहाकडे पाठ फिरवली. ज्या कॉलेजने इमारतीने साथ दिली त्या वास्तूशी बेइमानी केली. वसतिगृह बाहेरील खेड्यापाड्यातून आलेल्या गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी आश्रय स्थान होते. ही इमारत धोकादायक म्हणून तोडण्यात आली. परंतु ती तत्काळ बांधावी म्हणून कोणीही पुढाकार घेतला नाही.समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने १००/ रुपये जमा केले असते तरी ही इमारत उभी राहिली असती. नेत्यांनी मोठी मोठी पदे भोगली, आर्थिक समृद्धी मिळवली परंतु वसतिगृह तीस वर्षात बांधू शकले नाहीत. सरकार पैसे देईल तेंव्हाच आम्ही बांधू.... आमच्या खिशातील पाच पैसे देणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका जयंतीचा पैसा जरी आम्ही जमा करून दिला असता तरी या मुंबईत तीन चार भव्य विद्यार्थी वसतिगृह बांधून झाले असते. पण सगळा समाज जयंती आणि पुतळ्यात अडकलेला आहे. विद्यार्थी तरुण बरबाद झाला तरी चालेल..शिक्षणापासून वंचित राहिला तरी चालेल... सरकारच्या पैशावर प्रत्येक गोष्ट करणाऱ्या नेत्यांना,समाजाच्या लोकांना कोणत्या शब्दात धिक्कारावे हेच कळेनासे झाले आहे. ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी गद्दारी आहे. याचे भोग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांना,अधिकाऱ्यांना,व्यावसायिकांना, मास्तर, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, आणि समाजाला भोगावे लागणार हे लक्षात ठेवा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी, त्यांच्या विचारांशी सर्वांनीच गद्दारी केल्याने वयक्तिक, सामाजिक अन्याय, अत्याचार झाले, खून झाले तरी न्याय मिळत नाही. हे याचेच द्योतक आहे. आंबेडकरी समाजातील उच्चभ्रू लोकांच्या कडे आर्थिक समृद्धी आली ती सूज आहे. ही रोगाची सूज आहे. हे लक्षात ठेवा.
अकोल्यातील प्रा. मुकुंद भारसाखळे सर यांच्या कडे जाऊन जरा शिका या व्यक्तीने समाजाच्या सहाय्याने भव्य दिव्य काम केलेले आहे. त्यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांच्या प्रकल्पाला मा. शरद पवारांनी दहा कोटी रुपयांचा निधी देतो म्हणाले.... तो निधी त्यांनी सन्मान पूर्वक नाकारला. हा समाजाच्या निधीतून स्वयंपूर्ण प्रकल्प भारतातील पहिला असावा असे मला वाटते.
पत्रकार बाबा रामटेके
0 टिप्पण्या