Top Post Ad

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागरिकांचे दैनंदिन जीवन, व्यापार-उद्योग आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात टपाल विभागाचे योगदान अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल मंडळातर्फे ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात टपाल सेवा, आर्थिक समावेशन, टपाल तिकीट संग्रह, पार्सल वितरण तसेच तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. या  निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र के. जयभये यांच्या हस्ते जागतिक टपाल दिनानिमित्त एक विशेष शिक्का (कॅन्सलेशन) जारी करण्यात आला. माध्यमांशी बोलताना,  जयभाये यांनी पार्सल, मेल, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक व्यवसाय, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (पीएलआय) / रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स (आरपीएलआय) या चार प्रमुख व्यावसायिक विभागांमध्ये महाराष्ट्र सर्कलची अंदाजे २८% ते ३९% वाढ झाल्याचे अधोरेखित केले. तसेच, महाराष्ट्र सर्कलची प्रगती आणि इंडियाद्वारे प्रदान केली जाणारी विविध उत्पादने व सेवा दर्शवणारे एक पॉवरपॉइंट सादरीकरणही सादर केले. 

९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनानिमित्त सप्ताहाचा प्रारंभ झाला. यंदाची जागतिक टपाल दिनाची संकल्पना ‘एक टपाल जाळे, अनंत शक्यता’ अशी आहे. १८७४ मध्ये स्थापन झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र के. जयभये यांनी टपाल विभागातील कर्मचारी आणि ग्राहकांना जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत टपाल विभागाच्या विविध सेवा पोहोचविण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत ३.५९ कोटी सक्रिय खाती नोंदविण्यात आली आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची (आयपीपीबी) १.९२ कोटी खाती असून, १.१४ कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८.३७ लाख आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची कामे पूर्ण झाली. याच कालावधीत २.८२ लाख पासपोर्ट सेवा केंद्रांशी संबंधित नियुक्त्या हाताळण्यात आल्या. स्पीड पोस्टच्या १०.२१ कोटी वस्तूंची नोंदणी व वितरण करण्यात आले. याशिवाय २६.९० लाख स्पीड पोस्ट पार्सल, १०.३९ लाख इंडिया पोस्ट पार्सल कॉन्ट्रॅक्च्युअल, १५.९५ लाख रिटेल पार्सल, १३.९० लाख आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा (आयटीपीएस) वस्तू आणि १.१४ लाख ईएमएस वस्तूंची नोंदणी व वितरण करण्यात आले. परदेशात पाठविण्यात आलेल्या हवाई पार्सलची संख्या २३ हजारांवर पोहोचली.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित विशेष रात्र शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध टपाल व आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. गणेशोत्सव रात्र शिबिरांत ११,३१३ पोस्ट ऑफिस बचत बँक (पीओएसबी) खाती उघडण्यात आली. तसेच १.२२ कोटी रुपयांच्या प्रीमियमसह ५१८ टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) पॉलिसी नोंदविण्यात आल्या. याशिवाय ५७० बाल आधार नोंदणी, ५९१ सर्वसाधारण विमा सेवा आणि २१ ‘माय स्टॅम्प’ नोंदणी करण्यात आली.

१२ ऑक्टोबर रोजी टपाल तिकीट संग्रह दिनानिमित्त दुर्मिळ टपाल तिकिटे व टपाल साहित्याची प्रदर्शने, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. मंडळात सध्या ११,७२० टपाल तिकीट संग्रह ठेव खाती आहेत. चालू वर्षात २५ विशेष कव्हर्स आणि सात सानुकूलित ‘माय स्टॅम्प’ जारी करण्यात आले आहेत.

१३ ऑक्टोबर रोजी आर्थिक समावेशन आणि सीसीएस दिन साजरा केला जाणार आहे. पोस्ट ऑफिस बचत योजना, विमा, आधार आणि सामाजिक सुरक्षा सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर या दिवशी भर असेल. कोअर बँकिंग, इंटरनेट व मोबाइल बँकिंग, ई-पासबुक, आधार आधारित ई-केवायसी आणि आंतरकार्यक्षम शाखा पोस्ट ऑफिस सेवांमुळे ग्राहकांना आधुनिक सुविधा मिळत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून यूपीआय, आधार सक्षम पेमेंट प्रणाली (एईपीएस), घरपोच बँकिंग आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या सुविधा अधिक बळकट केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही या नेटवर्कचा लाभ मिळत आहे. सप्ताहादरम्यान विविध उपविभाग आणि मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ‘डाक चौपाल’ आयोजित करून बचत, विमा आणि आधार सेवांची माहिती दिली जाणार आहे.

१४ ऑक्टोबर रोजी टपाल आणि पार्सल दिनानिमित्त सर्व आरएमएस कार्यालयांतील सॉर्टिंग असिस्टंट्ससाठी टपाल वर्गीकरण स्पर्धा होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई विभागांतील प्रमुख २५ ग्राहकांसोबत व्यावसायिक बैठक आयोजित करून उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन साजरा केला जाणार असून, महाराष्ट्र व गोव्यातील प्रशासकीय कार्यालये आणि निवडक टपाल कार्यालयांमध्ये कर्मचारी व ग्राहकांसाठी तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार आहे.  इंडिया पोस्टच्या आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट (ईएमएस), आंतरराष्ट्रीय एअर पार्सल आणि आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा (आयटीपीएस) या सुविधांमुळे नागरिक, निर्यातदार आणि लघुउद्योजकांना परदेशात कागदपत्रे व वस्तू पाठविणे सोयीचे झाले आहे. विशेषतः पाच किलोपर्यंतच्या लहान मालाच्या पाठवणीसाठी आयटीपीएस सेवा उपयुक्त ठरत आहे.

आयटीपीएसच्या माध्यमातून २०२३-२४ मध्ये ८.७३ लाख, २०२४-२५ मध्ये ९.८१ लाख आणि २०२५-२६ मध्ये १४.२५ लाख वस्तूंची वाहतूक झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, म्हणजेच ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, १३.९० लाख वस्तूंची नोंदणी व वितरण करण्यात आले. राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या माध्यमातून पारंपरिक टपाल सेवांसोबतच डिजिटल सुविधा, आर्थिक समावेशन, ग्राहकाभिमुख सेवा आणि आंतरराष्ट्रीय संपर्क अधिक मजबूत करण्याचा टपाल विभागाचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत सुलभ, विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा पोहोचविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com