मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील नाव किंवा नोंदीबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत नोंदींबाबत दावे आणि हरकतीची प्रक्रिया योग्यप्रकारे पार पाडावी. तसेच, नागरिकांच्या सुविधेसाठी शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज १३ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा- लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) सौरभ कटियार, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) मनोहर पारकर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आदींची यावेळी उपस्थिती होती.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्यास माननीय भारत निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता पात्र नागरिकांना दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) - २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्यासाठी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदार नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे तसेच प्रारूप मतदार यादीतील नोंदींबाबत हरकती नोंदवण्याची प्रक्रिया दिनांक २६ ऑक्टज्ञेबर २०२६ पर्यंत होणार आहे. त्यामुळे, पात्र नागरिकांनी आणि नवमतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक अर्ज व दावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
*****
0 टिप्पण्या