ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. एकनाथ शिंदे ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला. पूर्णेकर कुटुंबाशी आपले अनेक वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध असल्याचे सांगताना प्रताप सरनाईक म्हणाले की, बाळकृष्ण पूर्णेकर, जयनाथ पूर्णेकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांशी जुने संबंध आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना अनेक सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबावर आलेल्या या दुःखद प्रसंगाची आपल्याला जाणीव असून, या कठीण काळात त्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेऊन ठाण्यातील संताप शांत करण्याचा आणि एकनाथ शिंदेंची प्रतिमा वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु पूर्णेकरांच्या पुतणीला आलेल्या नव्या धमक्यांनी आणि मीनाक्षी शिंदेंच्या सोशल मीडियाच्या उल्लेखांनी ठाण्यातील संशयाचा फास सैल होण्याऐवजी अधिक आवळला गेला असल्याची चर्चा आता मानपाड्यात सुरू आहे. तसेच काल सरनाईक यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेले पुर्णेकर हत्याकांडाचे तपास अधिकारी यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानेच आज सरनाईक यांना सारवासरव करण्यासाठी हा सारा खेळ करावा लागल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पूर्णेकर कुटुंबीयांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबीयांना धीर देत, या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन जे दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अनुभवी ज्येष्ठ वकिलांची मदत उपलब्ध करून देण्यात येईल. या प्रकरणात आवश्यक असलेले ज्येष्ठ वकील आणि सीनियर कौन्सिल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली. कुटुंबीयांच्या सुरक्षेसंदर्भात ज्या काही मागण्या असतील, त्यांची दखल घेऊन आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासात कोणताही राजकीय दबाव येता कामा नये आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, या घटनेनंतर ठाण्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने योग्य वेळ साधून कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दुःखद घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ नये, असे मत व्यक्त करत प्रताप सरनाईक म्हणाले की, अशा गंभीर प्रसंगी पीडित कुटुंबीयांना आधार देणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असून, पुढील काळातही पूर्णेकर कुटुंबीयांना आवश्यक ती मदत केली जाईल. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. कुटुंबीयांना आवश्यक ती कायदेशीर मदत आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या