अनधिकृत बांधकामांची स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे ठाणे शहरात वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना महापालिकेतर्फे राबवण्यात येत आहेत. मात्र या उपाययोजना केवळ कागदोपत्री असल्याने ठाण्यात सर्वत्र अनधिकृत बांधकाम सुरूच आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी केवळ दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्याचसोबत अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, कोणीही राहत नसलेली, त्याचबरोबर, व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र विशेष पथकाच्या अधिपत्याखाली कळवा खारेगाव इथे CTS. NO- 2981 इथे महाराष्ट्र शासनच्या जमिनीवर अनधिकृत गोडाऊन बांधण्यात आले असल्याची बाब आता समोर आली आहे. यामुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून संबंधित कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त काय करतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध करण्यासाठी प्रचंड प्रयत्नशील आहेत. मात्र प्रभाग अधिकारी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यानेच कळवा प्रभाग समिती हद्दीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. कळवा प्रभागात बेकायदा बांधकामांना ‘ विशेष परवानगी’चा धंदाच सुरू असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे. विटावा- एका चाळीच्या खोलीमागे ₹१.५० लाख, खारेगाव - प्रत्येक बेकायदा स्लॅबमागे ₹१० लाख. असे रेटकार्ड ठरले असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. आतापर्यंत विटाव्यात ५३ पेक्षा अधिक खोल्या आणि खारेगावमध्ये ५ स्लॅब उभारले गेले असल्याची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत जागृत ठाणेकरांनी वारंवार तक्रारी करूनही यावर कारवाई नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची तसेच होत असलेले बांधकाम यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ठाणे महानगर पालिकेत बेकायदा अनधिकृत बांधकामांचा हैदोस सुरु आहे. कोणीही उठतो रिकामा भूखंड ताब्यात घेतो. अधिकाऱ्यांशी लागेबांधे करतो. आर्थिक व्यवहार करतो आणि बेधडकपणे इमारती उभ्या करत आहे. कळवा, दिवा, मुंब्रा हा परिसरात तर अनेक सरकारी भूखंड या भूमाफियांनी हडप केले आहेत. या उपर ज्या स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनी होत्या त्याही लाटण्याचा प्रयत्न हे भूमाफिया करत आहेत. ठाण्यात अनधिकृत इमारती बांधण्याची भूमाफियांमध्ये चढाओढ लागली आहे. यामध्ये ठाणे महापालिकेचे अधिकारी आपले आर्थिक हित सांधून घेत आहेत. याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यास त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात येते. मात्र ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी याबाबत माहिती देण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करतात अन्यथा दिरंगाई करतात. जेणेकरून तेथील बांधकाम पूर्ण होऊन त्यामध्ये नागरिक रहायला आलेले असतात. इतकेच नव्हे तर अनेक बाबतीत न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या आणि पालिका अधिकाऱ्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंधामुळे न्यायालयाच्या निर्देशांना देखील नजरेआड करून ठाण्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. त्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासनाने अनास्थेचे धोरण अवलंबल्याने ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

0 टिप्पण्या