मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘पत्रकार दर्पण’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आनंदयात्री कवी तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ नाट्यनिर्माते राहुल भंडारे आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक तथा संघाचे उपाध्यक्ष विनोद साळवी, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, खजिनदार जगदीश भुवड, कार्यकारिणी सदस्य दिवाकर शेजवळकर, रजनीश राणे, विश्वस्त राही भिडे, अंतर्गत हिशेब तपासनीस संजय परब यांच्यासह पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद कसा शोधावा, याचे मार्मिक विवेचन करतांना शब्दांचे जादूगार, कवी, पत्रकार आणि मानसशास्त्रज्ञ प्रसाद कुलकर्णी आपल्या खास शैलीत म्हणाले, धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात माणूस आनंदी राहण्याचेच विसरून गेला आहे. आनंदी न राहण्यामुळेच ९० टक्के आजार उद्भवतात. त्यामुळे मनात काहीही साठवून ठेवू नका. व्यक्त व्हा, बोला आणि मन मोकळे करा, आनंदी जीवन कसे जगावे, आयुष्यात नेमके काय करावे याबाबत मोलाचा सल्ला प्रसाद कुलकर्णी यांनी दिला. कविता, शेरो-शायरी आणि चारोळ्यांच्या माध्यमातून त्यांनी जीवनातील आनंदाचे विविध पैलू उलगडले. त्यांच्या खुमासदार आणि हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, ‘‘पत्रकार दर्पण हा दिवाळी अंक दरवर्षी नफ्यात असतो. याचे संपूर्ण श्रेय संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि संपादकीय टीमच्या सांघिक मेहनतीला जाते. दिवाळी संपली तरी दिवाळी अंकांचे वाचन वर्षभर सुरू असते. यंदाच्या ‘पत्रकार दर्पण’मध्ये ‘जेन झी’च्या जमान्याचा विशेष वेध घेण्यात आला आहे. बदलत्या पिढीचे विचार, जीवनशैली आणि सामाजिक वास्तव यांचा मागोवा या अंकातून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा अंक ॲमेझॉनसह महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्री केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाचकांना हा अंक निश्चितच आवडेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिवाळीच्या निमित्ताने मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपणाऱ्या ‘पत्रकार दर्पण’चे अबू आझमी यांनी विशेष कौतुक केले. ‘‘दिवाळी हा आनंदाचा सण आहे. मात्र, साहित्याच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्याची परंपरा अधिक समृद्ध करणारी आहे. गेली ४८ वर्षे सातत्याने असा दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे,’’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ज्येष्ठ नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांनीही ‘पत्रकार दर्पण’च्या साहित्यिक गुणवत्तेचे कौतुक केले. मराठी पत्रकारांच्या कसदार लेखनाने सजलेला हा दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी उत्तम साहित्यिक मेजवानी असल्याचे त्यांनी सांगितले.कविता, विनोद, शेरो-शायरी आणि आनंदी जीवनाच्या विचारांनी रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना साहित्यिक आनंदाची अनोखी मेजवानी दिली.

0 टिप्पण्या