भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दि.२० मार्च १९२७ ला झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाचे विशेष महत्त्व आहे. स्वतंत्र दलित चळवळीची पायाभरणी याच सत्याग्रह आंदोलनातून झाली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तुंग नेतृत्वही यातूनच उदयास आले.
यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. या सत्याग्रहाचे प्रमुख संघटक होते, महाडच्या परिसरात राहणारे रामचंद्र बा.मोरे उर्फ आर.बी.मोरे. जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारीही होते. याच आर.बी. मोरे यांनी लिहिलेल्या, " सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याचा" या पुस्तकावर आधारित, " आत्मसन्मान व स्वाभिमानाचा " लढा" या "सिनेमाई माहितीपटाची" निर्मिती शताब्दी वर्षा निमित्ताने,आर.बी.मोरेंचे नातू व सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते, मुक्त पत्रकार सुबोध मोरे हे करीत आहेत.या " सिनेमाई माहितीपटाचे दिग्दर्शक आहेत सुदर्शन गमरे.सदर सिनेमाई माहितीपटाची निर्मिती " तिकीटबारी", प्रतिशब्द प्रकाशन व पाणी हक्क समिती, मुंबई " या तीन संस्थांच्या पुढाकाराने व लोकवर्गणी,देणग्यातून ( क्राउड फंडीग) होत आहे.या "'सिनेमाई माहितीपटात" महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाची कल्पना कशी पुढे आली, सत्याग्रह परिषदेची पूर्वतयारी कोकण व मुंबई परिसरातील सर्व सामान्य अस्पृश्य-स्पृश्य समाजातील कार्यकर्ते १९२४ ते १९२७ साला पर्यंत कशा पद्धतीने करीत होते.
परिषदेला जागा मिळविण्या पासून ते निधी जमा करणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना परिषदेला अध्यक्ष म्हणून बोलाविणे.त्यापुर्वी महाड परिसरातील गावांमध्ये कशा जागृती सभा, बैठका सुरू होत्या, कार्यकर्ते रात्रंदिवस परिषद यशस्वी करण्यासाठी कसे झटत होते आणि प्रत्यक्ष दि.१९-२० मार्च ची परिषद व सत्याग्रह करून पाणी पिण्याचा हक्क हजारो अस्पश्यांनी कसा मिळविला. त्यावेळी अस्पृश्य समाजातील कार्यकर्त्यांमध्ये कसा जोष, उत्साह होता.
प्रत्यक्ष पाणी पिण्याचा हक्क बजावल्या नंतर त्याचे समाजात कसे पडसाद उमटले व सनातनी, जातियवाद्यांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांवर कसे हल्ले केले,तसेच या सनातन्यांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पुन्हा त्याच महाडमध्ये दि.२५ डिसेंबर १९२७ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेली दुसरी " बहिष्कृत परिषद व मनुस्मृती दहन" बहिष्कृत भारत अंकाची निर्मिती.
आदी.सर्व ऐतिहासिक गोष्टींचा दृश्यात्मक अनुभव या सिनेमाई माहितीपटात" अनुभवायास मिळणार आहे. हा माहितीपट म्हणजे सामाजिक चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज आहे.अशा या माहितीपटाचा टिझर दि.१४ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर रिलीज, प्रकाशित झाला आहे. अशी माहिती माहितीपटाचे निर्मिती प्रमुख सुबोध मोरे, दिग्दर्शक सुदर्शन गमरे व पाणी हक्क समितीचे सिताराम शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपर्क: सुबोध मोरे :7709876029

0 टिप्पण्या