वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतिगृह, या वास्तुला प्रचंड राजकीय दबावानंतर धोकादायक ठरवल्या गेली. त्यानंतर मुंबई महापालिकाचे तात्कालिक आयुक्त मा.सिताराम कुंटे जे नंतर मंत्रालयात प्रधान सचिव ,उच्च शिक्षण विभाग, येथे कार्यरत झाले. तर तात्कालिक एफ/उत्तर. मनपा विभाग, माटुंगा मुंबई. येथील मा.सौ.अलका सासणे, अन्य पालिका अधिकारी यांनी ९ फेब्रुवारी २०१५ रोजी मोठ्या पोलीस फौज फाटा घेऊन या इमारतीला उध्वस्त केली. कुठील कारस्थानाचे व षंढयंत्राचे बळी ठरलेले सिद्धार्थ विहार वसतिगृह तोडण्यामागील गौडबंगाल काय होते. यांबाबत कोणत्याही आंबेडकरी नेत्याने अथवा कार्यकर्त्यांनी याची चौकशी केली नाही. सिद्धार्थ विहार वसतिगृह इमारत पाडण्यामागे कुणाचे हितसंबंध गुंतले होते याचा विचार आंबेडकरी जनतेने करणे गरजेचे आहे.
पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा सिद्धार्थ विहार वसतिगृह व डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि आजुबाजूच्या परिसरातील भुंखड हा शैक्षणिक उपक्रमासाठी राखीव आहे. मात्र अतिक्रमण करून झोपडपट्टीने व्यापलेला हा सर्व भुंखड गिळंकृत करण्यासाठी येथील विद्यमान मनुवादी लोकप्रतिनिधीसह तकलादु आंबेडकर चळवळीतील दलालांनी कटकारस्थान केले. बिल्डर्सकडुन देवाण घेवाण करून नावापुरता विरोध करत स्वतःचा स्वार्थाकरिता हा सारा खेळ करण्यात आला. हा भुंखड एस.आर.ए.योजना मध्ये बसत नसतांना विमल बिल्डर्स कडून ही योजना राबवली जात आहे. त्याचाच बळी सिद्धार्थ विहार वस्तीगृह ठरले आहे. या भुख॔डावरील झोपडपट्टीत बहुतांश लोक हे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वर्चस्वाखाली असून डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या शैक्षणिक संस्थेच्या भुंखडावर यांचा डोळा आहे. तसेच त्यांच्या शिक्षण संस्था उध्वस्थ करण्याचा यांचा नियोजनबद्ध डाव पुर्ण होतांना दिसत आहे. बाबासाहेबांच्या उद्देशातील शैक्षणिक संकुल न होण्यासाठी प्रस्थापित यंत्रणा कार्यरत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टाने निर्माण केलेली पीपल्स एज्युकेशन संस्था आजही देशातील बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. या संस्थेची व्याप्ती देशभर व्हावी बहुजन मुला-मुलीना शिक्षण घेता यावे याकरिता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक भागात पीपल्स एज्युकेशन संस्थेची कॉलेज, वस्तीगृह बांधण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भुखंड घेऊन ठेवले होते. आज त्या भूखंडांची स्थिती काय आहे याबाबत न बोललेलेच बरे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांमध्ये मुंबईतील वडाळा येथील सुमारे ५० ते ६० एकरच्या भुखंडांपैकी काही भागावर डॉ.आंबेडकर महाविद्यालय आणि सिद्धार्थ हॉस्टेल बांधण्यात आले. प्लॉट क्रमांक 306 हया भूखंडावर १९६० साली सिध्दार्थ विहार वस्तीगृह बांधण्यात आले आणि १९७० साली इंदिरा गांधी यांच्या हस्ते भूमिपूजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय बांधण्यात आले. हे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठे एकमेव कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स महाविद्यालय म्हणून गणले जाते.
या महाविद्यालयाच्या बाजुलाच असलेले सिध्दार्थ विहार वस्तीगृह हे परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम निवासाची सोय देत होते. त्यामुळे अनेकांना शिक्षण घेता येत होते. बाहेर छोटी मोठी मिळेल ती कामे करून सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये राहून उच्चशिक्षित झाले आहेत. मात्र कालांतराने या हॉस्टेलला राजकीय लोकांचा वेढा पडला त्यामुळे विद्यार्थी कमी आणि समाजातील राजकीय कार्यकर्ते आणि स्वंयघोषित पुढारी यांचा जास्त भरणा येथे वाढत गेला. तरीही गावखेड्यातील गोरगरीब शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आलेल्या मुलांना राहण्यासाठी एक आशेच किरण होते. मात्र स्वत:ला प्रतिष्ठित समजणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आणि स्वंयघोषित पुढाऱ्यांनी सदर वास्तूची व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे आणि त्याकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या वास्तूची काही प्रमाणात दुरावस्था झाली होती. मात्र फूकट जागा आडवणाऱे कार्यकर्ते, स्वयंघोषित पुढारी आणि मुंबई महानगर पालिकेच्या जातीवादी अधिकाऱ्यांनी सदर वास्तूला धोकादायक घोषित केले. केवळ घोषित करूनच थांबले नाहीतर तर तात्काळ त्याच्या निष्कासनाची कारवाई देखील करण्यात आली. सिध्दार्थ विहार वस्तीगृहाची इमारत जमिनदोस्त केल्याने खेडेगावातून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांचे मुंबईतील आश्रयस्थान उद्वस्त झाले परिणामी शहरात येऊन कामधंदा करून शिक्षण घेण्याचे स्वप्न देखील उद्वस्त झाले.
आजही काही माजी विद्यार्थी वस्तीगृह होते म्हणून आम्ही मुंबईत राहून शिकलो, मोठे झालो पण आता आमच्या गावखेड्यातील गोरगरीब मुलांना मुंबई येऊन शिक्षण घेण्याची पावल बंद झाली असल्याची खंत व्यक्त करतात. याबाबत अनेक विद्यार्थी कोणीतरी पुढाकार घेऊन सिध्दार्थ विहार वस्तीगृह पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी पुढाकार घेऊन याबाबत काय करता येईल यासाठी अनेक लोकांशी चर्चा केली. त्यासाठी पवार यांनी कृतिशील कार्यक्रमाची योजना आखली. आणि लवकरच ही वास्तू उभी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांची फळी निर्माण केली. मात्र ही बाब तथाकथित आंबेडकरी नेत्यांपर्यंत पोहोचली आणि तात्काळ एका बड्या नेत्याने प्रशासकीय सूत्रे फिरवली. प्रकरणातील वास्तव लोकांपुढे येण्याच्या आत पत्रकार परिषद घेऊन सिध्दार्थ वस्तीगृह पुनर्निर्माण करण्यासाठी ७० कोटी रुपयांचा फंड घोषित केला. तर दुसर्या नेत्यांनी लगेच महायुती समर्थक कॅबिनेट मंत्री मा. दिपक केसरकर यांच्या हस्ते सिध्दार्थ विहार वस्तीगृह पुनर्बांधणी भूमिपूजन कार्यक्रम उरकून घेतला. याबाबत राजू पवार यांनी माहिती अधिकाराखाली सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उत्तर मिळाले, केंद्राच्या अर्थ संकल्पात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा येथील पिंपल्स एज्युकेशन संस्थेच्या सिध्दार्थ विहार वस्तीगृहासाठी कोणत्याही आर्थिक निधीची तरतूद नाही, माहिती निरंक आहे. मग या स्वयंघोषित तथाकथित नेत्याने कोणत्या आधारावर ७० कोटी रुपयांचा निधी घोषित केला आणि का? अशा प्रकारे समाजाची फसवणूक करण्याचा या नेत्यांना कोणी अधिकार दिला असा सवाल राजू पवार यांनी केला आहे.
त्यानंतर सामाजिक विकास खाते महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दि पिंपल्स एज्युकेशन संस्था हया संस्थेच्या वडाळा, मुंबई येथील सिध्दार्थ विहार वस्तीगृहासाठी शासनाने काही तरतूद केली आहे का? अशी माहिती मागवली असता, शासनास फक्त प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्लॉट क्रमांक 306 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा, मुंबई 31. येथील सिध्दार्थ विहार वस्तीगृहाच्या रिडेव्हलपमेंन्टसाठी देण्यात आलेल्या प्लानच्या छायांकित प्रति मिळण्याकरिता वडाळा, ॲन्टॉप हिल मुंबई येथे असलेले महानगर पालिकेचे बिल्डिंग प्रपोजल विभाग. हया विभागात माहिती मागीतली. तेंव्हा तेथील माहिती अधिकारी यांनी स्पष्टपणे सदर बाब ही एसआरए पुनर्वसन योजनेत मोडत असून आपण एसआरए कार्यालयाशी अर्जाची प्रत घेऊन संपर्क साधावा असे उत्तर दिले आहे. तसेच माहितीसाठी मुळ अर्ज एसआरए कार्यालयात उच्चीत कारवाई करीता पाठविण्यात आला असल्याचेही संबंधित विभागाने कळवले.
सिद्धार्थ विहार वस्तीगृहाबाबत आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडाबाबत अधिक खोलवर काही लोकांशी चर्चा केली असता या भूखंडाच्या बदल्यात २०२४ ला पिंपल्स एज्युकेशन संस्थेस दोन लॉ कॉलेजची (विधि महाविद्यालय) परवानगी देण्यात आली आहे. असाच एक भुखंड खार पश्चिम मुंबई ५२ येथील कोकणस्थ को.ऑप सोसायटीचा भुखंड एसआरएच्या माध्यमातून बिल्डरच्या घशात घालण्यात आला असल्याचीही माहिती मिळाली आहे. अशा पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेज वडाळा कॉलेज आणि वस्तीगृहाची निर्मिती होऊ नये यासाठी काही सेटल् मेंन्ट झाल्याच्या गोष्टी आता चर्चेतून बाहेर येत आहेत. मी याबाबतअधिक माहिती घेत असून लवकरच या सर्व प्रकरणाचा पर्दापाश करून या जागेसाठी कुणी कुणी मलई खाल्ली आणि कुणी कुणी आपला फायदा करून घेतला आहे हे आंबेडकरी समाजासमोर आणल्याशिवाय राहणार नाही - राजू पवार (मुंबई)
0 टिप्पण्या