Top Post Ad

शिव (SION) रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीला वेग

 शीव (SION) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या पुलाच्‍या सर्व बाजूची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी या उड्डाणूपल प्रकल्‍पाची पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले


मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP - 2) अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६ वी) टाकणे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध व्‍हावी म्‍हणून शीव (Sion) स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी करण्‍याचे काम रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले आहे. तसेच, हा पूल ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरविण्यात आल्‍याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले होते.  

रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे (Approach Roads) नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. या पूल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाच्या निधीमधून करण्यात येत आहे. निविदेनुसार या पुलाच्‍या पुनर्बांधणीचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, तत्‍पुर्वीच हा पूल सुरू करण्‍याचे निर्देश .अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. 

रेल्वे रुळांवरून जाणा-या ५०० टन वजनी पहिल्या पोलादी तुळईच्‍या (GIRDER) डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण दिनांक २१ ऑगस्‍ट २०२६ रोजी आणि दुसऱ्या पोलादी तुळईच्‍या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण दिनांक २९ ऑगस्‍ट २०२६ रोजी मध्य रेल्वेमार्फत  करण्यात आले आहे. तसेच दोन्ही तुळ्यांचे अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठड्याचे (Crash Barrier) काम प्रगतिपथावर आहे. डेक स्लॅबच्या काँक्रिट वेअरिंग कोटचे कामदेखील प्रगतिपथावर आहे.

सद्यस्थितीत पुलाच्या पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहीदास मार्ग (धारावी) पर्यंतच्‍या पोहोच रस्त्याचे पुनर्बांधकाम हे  महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्‍प्‍यात आहे. पुलाच्या पूर्वेकडील जागा अंशतः मध्य रेल्वे प्रशासनाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेस दिनांक २५ ऑगस्‍ट २०२६ पासून पोहोच रस्त्याच्या कामाकरिता हस्तांतरित करण्यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्वेकडील पोहोच रस्त्याचे काम  महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. इतर सिमेंट काँक्रीटचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वे सोबत समन्वय साधून या पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी  महानगरपालिका प्रयत्नशील आहे.    

हा नवीन उड्डाणपूल ५४.५ मीटरचा एकच लांब स्पॅन (Single Span) आणि २९ मीटर रुंदीचा आहे. या आराखड्यानुसार, पुलाखाली खांब नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्‍यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.  ऑक्टोबर महिन्यात हा पूल सुरू झाल्यानंतर सायन, धारावी, कुर्ला आणि लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. 


 भायखळा येथील सीताराम सिलम उड्डाणपूल (Y Bridge) ते कुतुब - ए - कोंकण मखदूम अली माहिमी उड्डाणपूल (जे.जे. उड्डाणपूल) यांना जोडणा-या जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालय जंक्‍शन येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मुख्य केबल - स्टे पूल व वायाडक्ट तसेच पूर्व आणि पश्चिम बाजूस जोडणाऱ्या फ्लायओव्हर आर्म्सचा समावेश आहे.अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, सविस्‍तर आढावा घेत विविध निर्देश दिले.   

सर्वसमावेशक वाहतूक गतिशीलता आराखड्यानुसार (Comprehensive Mobility Plan) या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्‍यात आले आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य केबल - स्टे व वायाडक्ट भागाची एकूण रचना २ + २ लेन स्वरूपाची आहे. केबल - स्टे भागाची लांबी सुमारे २३० मीटर, तर वायाडक्टची लांबी ३१२ मीटर आहे. या भागाची रुंदी १६.५ मीटर असून, डाव्या बाजूचा अप रॅम्प २०५ मीटर x ५.२५ मीटर, तर उजव्या बाजूचा अप रॅम्प २१३ मीटर x ५.२५ मीटर आहे. या संरचनेच्या बांधकामामध्ये आरसीसी (RCC) तसेच स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची संरचनात्मक मजबुती, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन वापराच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक मानके साध्य करण्यास मदत होणार आहे.

मुख्य उड्डाणपुलाला जोडण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेला फ्लायओव्हर आर्म्स विकसित करण्यात येत आहेत. हे आर्म्स १ + १ लेन स्वरूपाचे असतील. पश्चिम बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे २९० मीटर, तर पूर्व बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे ३५० मीटर आहे. दोन्ही बाजूंच्या फ्लायओव्हर आर्मची रुंदी ८.५ मीटर असून, त्यांच्या बांधकामासाठीही आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या संरचनात्मक पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य केबल - स्टे पूल, वायाडक्ट आणि दोन्ही बाजूंचे फ्लायओव्हर आर्म्स यांची एकत्रित रचना केल्यामुळे विविध दिशांनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

या पूल प्रकल्‍पाचा निर्धारित कालावधी पावसाळा वगळून २६ महिने म्‍हणजेच मे २०२२८ अशी आहे. सद्यस्थितीत अंमलबजावणीच्या टप्प्यात असलेल्‍या पूल प्रकल्‍पाची भौतिक प्रगती २२ टक्के आहे. तथापि, निर्धारित कालावधीपूर्वी प्रकल्‍प पुर्ततेसाठी कामाचे प्रभावी नियोजन करावे. आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता तसेच विविध विभागांमध्ये योग्य समन्वय साधावा. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.  

प्रस्‍तावित उड्डाणपुलामुळे सर जमशेटजी जीजीभाई (Sir Jamsetjee Jeejeebhoy) मार्गासह भायखळा - नागपाडा - माझगाव या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक पट्ट्यातील जंक्शनवरील कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ कमी होण्यास, पूर्व - पश्चिम व उत्तर - दक्षिण दिशेने होणाऱ्या वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. 

प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंता, अधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com