Top Post Ad

Pedestrian First... व्यावसायिक जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी नियमांचे पालन करण्याचे निर्देश

उत्सव कालावधीत  नागरिकांना पायी मार्गक्रमण करणे सुलभ असायला हवे.  या कालावधीत पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना अडथळा निर्माण होईल, अशाप्रकारे रस्ते आणि पदपथांवर जाहिराती प्रदर्शित करू नयेत. ’पादचारी प्रथम (Pedestrian First)’ अभियानासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि हे अभियान मुंबईत मोठ्या स्वरूपात प्रभावी पध्दतीने राबविण्यात येत आहे.  रस्ते, पदपथांवर अनधिकृतपणे जाहिराती लावू नयेत आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, उत्सव अधिकाधिक सेवा सुविधांयुक्त असावा, या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर,  उत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि अनुज्ञापन विभागाने (लायसन्स) या नियमांचे पालन करून अडथळे ठरणारे जाहिरात फलक त्वरित काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त  भिडे यांनी दिले आहेत.

जाहिरातींसंदर्भात प्रमुख नियम -  १. उत्सव मंडळांनी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, इतर प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित करणे प्रकर्षाने टाळावे.  २. जाहिराती प्रदर्शित करताना पदपथावरील पादचाऱ्यांना तसेच रस्त्यावरील वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.  ३. मंडळाच्या पारंपरिक प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूवर मंडळास 'भक्तांचे हार्दिक स्वागत' संदेश लावता येईल. प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या उभ्या बाजूवर देणगीदारांची व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करता येईल. ४. सामाजिक व नागरी संदेश प्रदर्शित करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. ५. उत्सव मंडळांना डिजिटल माध्यमातून जनहिताचे/आरोग्यविषयक संदेश तसेच व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता १० बाय १०' मर्यादेपर्यंतच्या आकारमानाचे डिजिटल स्क्रिन वाहतूक विभागाचे व स्थानिक पोलिस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यासापेक्ष लावण्याकरिता परवानगी देण्यात येईल.

विसर्जनानंतरही नियम लागू - सार्वजनिक उत्सवाच्या कालावधीत तसेच विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी सदर जाहिरात फलक संबंधित मंडळांनी स्वतः पुढाकार घेऊन काढून टाकावे. सार्वजनिक उत्सवाचा धार्मिक व सामाजिक आशय कायम राखत जाहिरात प्रदर्शन शिस्तबद्ध पद्धतीने करावे आणि निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.

---------------

 श्रीगणरायाचे आगमन आणि त्यानंतर मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज (१३ सप्टेंबर) मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील विविध विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. मुंबई शहर विभागातील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आदी विसर्जन स्थळांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली पूर्वतयारी, उपलब्ध नागरी सेवा-सुविधा तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची डॉ. ढाकणे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहायक आयुक्त  संतोष साळुंखे, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त  चक्रपाणी अल्ले, एस विभागाच्या सहायक आयुक्त   समरिन सय्यद आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात आलेले निरीक्षण मनोरे, तराफे, निर्माल्य कलश तसेच गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकांना अडथळा येऊ नये म्हणून बसविण्यात आलेल्या स्टील प्लेट आदी सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश डॉ. ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गणपती मूर्ती विसर्जनादरम्यान महानगरपालिका यंत्रणेने अधिकाधिक खबरदारी घ्यावी, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पश्चिम उपनगरातील जुहू समुद्र किनारा आणि पूर्व उपनगरातील पवई तलाव येथील विसर्जन स्थळांवर उभारण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांचीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जुहू चौपाटी येथील समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच लहान श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उभारण्यावर भर द्यावा, अशा सूचना डॉ. ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पवई तलाव येथील गणेश घाट व पवारवाडी घाट येथे मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासोबतच विसर्जन स्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची संख्या वाढवून गणेशभक्तांनी निर्माल्य त्यातच टाकावे, यासाठी जनजागृती व आवाहन करण्यात यावे, अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी दिल्या. श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन स्थळी येणाऱ्या गणेशभक्तांना आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडणे, तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मूर्ती विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून क्रेनची सुविधा मोफत पुरविण्यात येते. या सुविधेबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्याच्या सूचनाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com