दिनांक १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत, १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी, झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाश्यांनी स्वतःहून तात्काळ निष्कासित करावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने, झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरे क्षेत्रात एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत स्थित आहेत. दरम्यान, ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ६११ झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तात्काळ निष्कासित करावीत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.दरम्यान, अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने कारवाई सुरू आहे. दिनांक २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर, १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. तथापि, नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच अशाप्रकारचे बांधकाम केले असल्यास ते स्वतःहून तात्काळ हटवावेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

0 टिप्पण्या