मुंबई, नवी मुंबई ठाण्यासह राज्यातील वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, लातूर, नांदेड-वाघाळा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, मालेगाव, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, इचलकरंजी, जालना, परभणी या 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहिर केला. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील. तर 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे / 31 डिसेंबर अर्जाची छाननी / 2 जानेवारी उमेदवारी माघारीची मुदत / 3 जानेवारी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी / 15 जानेवारी मतदान / 16 जानेवारी निकाल असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.
मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील. राज्यातील 1,96, 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल. तसेच मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.

0 टिप्पण्या