स्त्री मुक्ती परिषदेच्या सुर्वण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय परिषदेचा समारोप आज मोठ्या उत्साहाने यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडला. या निमित्ताने एक ‘ठराव जाहीरनामा’ सादर करण्यात आला. या सादरीकरणाप्रसंगी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार आदी मान्यवर उपस्थित होत्या. या ठरावात महिला आयोग, जेन्डर बजेट, मनारेगाचा हक्क आम्ही सोडणार नाही. मुस्लिम महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, देशातील सांप्रदायिक हिंसाचार आणि सांप्रदायिक राजकीय वातावरणाचा मुकाबला आमची जबाबदारी, मनुस्मृती नको संविधान हवे, कौटुंबिक हिंसचार, जात आधारित हिंसा आणि छळवणूक, क्वीअरट्रान्स लोकांचे प्रश्न, पॅलेस्टाईन आणि गाझा मधील जनसंहार, सेफ्टी ऑडिट, अपंग महिलांचे प्रश्न, आमच्या गरजांप्रमाणे आरोग्य सेवा हवी, लैंगिक सेवा पुरविणारे लैंगिक श्रमिक, सार्वजनिक वाहतुक, नैसर्गिक संसाधने आणि महिला, कचरावेचक आणि कचरा व्यवस्थापन, प्रसार माध्यमे आणि सोशय मिडिया आणि शालेख आणिविद्यापीठीय अभ्यासक्रमातून स्त्री चळवळीचा समावेश करण्याबाबत तसेच सांस्कृतिक जीवनामध्ये भर घातली आहे, त्याची ओळख करून देण्यात आली. आदी मुद्दे या ठरावात मांडण्यात आले.
या समारोपाच्या निमित्ताने मुंबईतील आझाद मैदानात सांस्कृतिक मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या महिला प्रतिनिधींनी आपल्या कविता सादर केल्या आणि गाणी म्हटली. तसेच विविध पंथातील आदिवासी, मुस्लिम महिला, कष्टकरी महिला आदींना मंचावर येऊन आपल्या विभागातील समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. या सभेत एका महिलेने असा प्रस्ताव मांडला की, आजही अनेक गावात चावडीवर स्त्रियांना प्रवेश नसतो. तेव्हा त्या जागी गावातील महिला LGBTQ + मधील प्रतिनिधी यासर्वांना घेऊन ‘चावडी सावित्री फातीमाची’ हा उपक्रम राबवावा. या उपक्रमातंर्गत सर्वांनी एकत्र येऊन चावडीवर एखादे किर्तन, भारूड, व्याख्यान किंवा कोणतीही चर्चा तिथे मांडावी. याची सुरूवात येत्या ३ जानेवारीपासून करण्यात यावी. जेणेकरून सावित्रीबाई फुले यांना ती आपल्याकडून मिळणारी मानवंदना असेल.
‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकाच्या प्रतिनिधीने आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या की, समता हवी असेल तर ममता असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याव आधारित असलेली व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. स्त्री मुक्ती चळवळीचे प्रतिनिधी सुरज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, गेल्या ५० वर्षांत स्त्री मुक्ती चळवळीचे बरेच काम झाले आहे. या पुढेही काम होत राहिल. पण खरी गरज आहे ती पुरूषांना समानतेची भाषा समजवण्याची आणि या भाषेचा प्रसार घराघरातूनच झाला पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळ ही पुरूषविरोधी नसून पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात आहेत. पुरूष म्हणजे मर्दागी हा विचार खोडून काढला पाहिजे.

0 टिप्पण्या