Top Post Ad

सुट्टीचा आनंद की मृत्यूचा सापळा?

सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांकडे धाव घेत आहेत. समुद्रकिनारे, निसर्गरम्य ठिकाणे आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी उसळली आहे. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगारनिर्मिती होते, हॉटेल व्यवसाय आणि ‘होम स्टे’सारख्या संकल्पना बहरतात. मात्र या सर्व सकारात्मक बाजूंसोबतच एक गंभीर आणि चिंताजनक वास्तवही समोर येत आहे, ते म्हणजे पर्यटकांचा वाढता अतिउत्साह आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटना. गोव्यात नुकत्याच घडलेल्या हॉटेल आगीच्या भीषण घटनेनंतर यंदा अनेक पर्यटकांनी गोव्याऐवजी कोकणाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, पुणे परिसरातून हजारो पर्यटक कोकणाकडे रवाना झाले. परिणामी मुंबई–गोवा महामार्गासह मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पेण–माणगाव पट्ट्यात वाहनांच्या रांगा लागल्या, तर अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हर्णे, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, आरे–वारे, रत्नागिरी, जैतापूर आदी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले.

गणपतीपुळे यासारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन व श्रद्धास्थळावर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला, तरी कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी नसल्याचे वास्तव समोर येत आहे. पर्यटन हंगाम दरवर्षी येतो, पर्यटकांची गर्दीही वाढत आहे, मात्र त्यानुसार यंत्रणांची सज्जता दिसून येत नाही.पर्यटकांच्या अतिउत्साहाचे गंभीर परिणाम नुकतेच गुहागर येथे पाहायला मिळाले. गुहागरच्या वरचा पाट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर २७ डिसेंबर रोजी दोन कुटुंबांतील सदस्य समुद्रात उतरले. पाण्यात खेळताना ४२ वर्षीय अमोल विजयकुमार मुथ्था यांना समुद्राच्या प्रवाहाने खोल पाण्यात ओढले. किनाऱ्यावर परतण्याचा प्रयत्न करताना त्यांची दमछाक झाली आणि दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन मुले आणि एका महिलेला जीव रक्षकांनी वाचवले, मात्र एक कुटुंबकर्ताच नववर्षाच्या उंबरठ्यावर काळाच्या पडद्याआड गेला.

या घटनेतून एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते, ती म्हणजे समुद्रातील धोका ओळखण्याचा अभाव. अनेक पर्यटकांना पोहता येत असले, तरी समुद्रात पोहण्याचा अनुभव नसतो. भरती-ओहोटी, लाटांचा वेग, पाण्याची खोली, प्रवाहाची दिशा याचा अंदाज न घेता समुद्रात उतरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. तलावात किंवा नदीत पोहणे आणि समुद्रात पोहणे यात जमीन-आसमानाचा फरक आहे, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त, प्रशिक्षित जीव रक्षक, स्पष्ट सूचना देणारे फलक, धोकादायक भागात बंदी आणि ठरावीक वेळेतच समुद्रात उतरण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. नगरपंचायती, पोलीस प्रशासन आणि पर्यटन विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो, ही बाब गंभीर आहे.

त्याचबरोबर पर्यटकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुट्टीचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन, सूचनांकडे लक्ष आणि संयम आवश्यक आहे. मद्याच्या नशेत समुद्रात उतरणे, जीव धोक्यात घालणे किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करणे हे प्रकार केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही धोकादायक ठरतात.पर्यटन हा आनंद, विश्रांती आणि अनुभवांचा उत्सव असावा; तो मृत्यूचा सापळा ठरू नये. यासाठी प्रशासनाची सज्जता आणि पर्यटकांची सजगता या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नववर्षाचे स्वागत करताना अतिउत्साह नव्हे, तर सुरक्षितता, जबाबदारी आणि शिस्त हाच खरा उत्सव ठरावा, हीच अपेक्षा.

  • शिरीष वानखेडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com