रस्त्यांवरून येता जाता रोजच सिग्नल तोडून बाईकवरून जाणारी तरुण पोरं दिसतात. त्यात अनेक असतात फूड डिलिव्हरी बॉयज. पाऊस, कडक उन्ह व थंडीत ही तरुण पोरं जिवाच्या आकांताने बाईक पळवत असतात. ही पोरं सिग्नलचे नियमही पाळत नाहीत, म्हणून पूर्वी राग यायचा. इतकी कसली घाई असते यांना, या घाईत मरतील एखादं दिवशी, असं वाटायचं.
मग लक्षात आलं की घाई त्यांच्या डोक्यावर जबरदस्तीने थोपवण्यात आली आहे. त्यांच्या कंपन्या या घाईला जबाबदार आहेत. फक्त 10 वा 15 मिनिटांत खाद्यपदार्थ वा अन्य वस्तू तुमच्या घरात पोहोचवण्याची मोठी जाहिरात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीट, झेप्टो आदी कंपन्या करतात आणि प्रत्यक्ष जबाबदारी ढकलतात या फूड डिलिव्हरी बॉयजवर. जिथं कुठे त्यांचं डार्क स्टोर (गोदाम) आणि क्लाऊड किचन (ऑनलाईन ऑर्डर घेऊन खाद्यपदार्थ बनवून देणारं ठिकाण) असतं, तिथून पार्सल घेऊन वेळेपूर्वी गिऱ्हाईकाकडे पोहोचवायचं, ही जबाबदारी या पोरांची.
ते वेळेत येतंय की नाही, यासाठी अनेक जण घरी घड्याळातील काटे मोजत असतात. थोडा जरी उशीर झाला तरी फूड डिलिव्हरी बॉयजना शिव्या आणि कंपनीकडे तक्रार. मग बॉयला डिलिव्हरीमागे मिळणारी रक्कम कमी होते. त्याच्या डिलिव्हरी कमी करणं, एखादं दिवस घरी बसवणं कामावरून काढणं हेही प्रकार सर्रास होतात. या मुलांचे कामाचे तास तब्बल 12. पगार डिलिव्हरीवर अवलंबून. नोकरीची हमी नाही. बहुतांशी ठिकाणी स्वतःची बाईक असेल तरच नोकरी. काही कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर देतात. पण त्यासाठीचे पैसे कापून घेतले जातात.
खाद्यपदार्थ घरी आणून देणारी ही मुलं स्वतः मात्र रस्त्यावरची स्वस्त टपरी शोधून तिथं काही तरी अस्वच्छ खाताना दिसतात. उन्हात पार काळवंडलेली आणि चेहऱ्यावर फक्त घाई दिसणारी ही मुलं आपल्या आयुष्याचा आता भाग बनली आहेत. मुंबई व परिसरात अशी साडेसात लाख मुलं आहेत. प्रचंड नफा कमावणाऱ्या कंपन्यांचे हे असंघटित कामगार. नोकरी व कामाची शाश्वती नसलेल्या यांना गिग वर्कर्स म्हटलं जातं. त्यात कमी शिक्षित आणि उच्च शिक्षित तरुणही आहेत.
देशात यांची संख्या आहे तब्बल सव्वा कोटी. पुढील पाच वर्षांत ही संख्या अडीच कोटी होईल, असं नीति आयोग सांगतो. हे सारे कामगार कुठे तरी झोपड्यांत, रस्त्यावर किंवा अनधिकृत/अधिकृत चाळीत राहतात. या कामगारांचे आईबापही असंघटित असणार. पण यांचे कष्ट आईबापापेक्षा खूपच वाढले आहेत. या देशामध्ये हातात मोबाइल आणि बाईक असेल तर तुम्ही उन्ह-पावसात मरमर करणारे असंघटित कामगार बनू शकता. पण सरकारच्या लेखी बेरोजगारी कमी झाली.
आज देशातील हे सारे गिग वर्कर्स एक दिवस संपावर आहेत. नोकरीची शाश्वती, डिलिव्हरी टाइम वाढवा, किमान वेतन द्या आणि ड्युटी आठ तास करा, अशा त्यांच्या खूपच साध्या व किरकोळ मागण्या आहेत. गिऱ्हाईक म्हणून त्यांच्या मागण्यांना आपण सर्वांनीही पाठिंबा द्यायला हवा
0 टिप्पण्या