२०१४ ला सत्तेत आल्यानंतर भाजपा तथा प्रधानमंत्री मोदी यांनी जी जी म्हणून स्वप्नं दाखवली त्यांचा आज अक्षरशः चोथा तर झालाच आहे पण जनताही सत्तेऐवजी आपसातच एक दुसऱ्याची दुष्मन होऊन राहिली आहे. " बटेंगे तो कटेंगे " म्हणत सत्ताच आज जनतेला विभागतही आहे आणि आपसात लढवून कापतही आहे. नफरत आणि टकराव आज केवळ राजनीति मध्येच मर्यादित न रहाता त्याचा धब़धबा आज समाजातही धो धो वाहू लागला आहे. आणि आश्चर्य असे की " मेरा देश महान " म्हणत जनता यालाच राजकारण समजू व म्हणू लागली आहे. ब्लॅक मनी देशात आणू म्हणणारे मोदी आज २०१२ - १३ च्या तुलनेत तो एकट्या स्विस बॅंकेतच ७५ टक्क्यांनी वाढला तरी तिथेच आहे . निवडणूक जिंकण्यासाठी गरज पडली की सत्ताधारी या ब्लॅक मनीचा फायदा घेतात . ३० टक्के कमी भावात रशिया चे कच्चे तेल घेऊन सरकार अडानी - अंबानीला फायदा पोहोचवत आले आहे . अमेरिकेतील गुंतवणूकदारांचा पैसा अडानीने अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी वापरला म्हणून अमेरिका प्रशासनाने अडानीला समन्स बजावले .
पण मोदी सरकारने ते अडानीपर्यंत जाऊच दिले नाही. म्हणून मग ट्रम्पने भारताला रशियाकडून स्वस्त दरात तेल खरीदीवर बंदी घातली.कारण त्याचा फायदा अडानी - अंबानीला मिळत होता . शेतकऱ्यांना ७००च्यावर बलिदाने देऊन दीड वर्षे आंदोलन करून आपली शेतजमीन वाचवावी लागली अन्यथा तीही कार्पोरेटच्या घशात गेली असती .शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल तर झाले नाही पण कृषी क्षेत्रात कार्पोरेट मंडळी घुसून त्यांनी जी एक सर्वांगीण मक्तेदारी निर्माण केली त्यातून शेतीची लागत मात्र पाच पटीने वाढली . उत्पन्न २० टक्क्यांनी कमी झाले. यावर कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून मग ढोल ताशे वाजवत शेतकऱ्यांसाठी " सन्मान निधी" चं गाजर ! चार महिन्यात २ हजार वर्षात ६ हजार . आणि कृषी खर्च वाढला १८ हजारांनी !
. जातीय समीकरण आणि बॅंकांचे विलिनीकरण यात ३.५ लाख नोकऱ्यांचा बळी घेतला गेला ! दुसरीकडे एका वर्गाची थेट भरती , १० टक्के आरक्षण मात्र निर्विघ्नपणे होत राहिले . सरकारी भरती ही केवळ जाहिरात देण्यापुरती व फॉर्मचे पैसे जमा करण्यासाठीच उरली . सरकारी अस्थापनात आज ९० लाख पदे रिक्त आहेत. पण भरली जात नाहीत .
देशाचा औद्योगिक कणा असलेली आठही सेक्टर २ ते ११ टक्के मायन्समध्ये म्हणजे खाली घसरली गेली आहेत ,हे विकासाचे कोणते मॉडेल आहे ? , विकासाची कोणती परिभाषा आहे ? तथापि याची मात्र कुठे कसली बोंब नाही की कसली चर्चा नाही. उलट चर्चा केवळ भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांची !
हिंदू - मुस्लिमची ! नेत्यांच्या " वार - पलटवार" यांची . मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कसा " विश्वगुरु" होतोय याची ! बहुजनांची पोरं स्पर्धा परीक्षांमध्येही अव्वल येऊ लागली तशी परीक्षांची पेपर फुटी ही कधी एका " ऑर्गनायझज्ड इंडस्ट्री " मध्ये रुपांतरित झाली हे जनतेला कळलेच नाही. तो पैसा दलाल , नेते आणि हस्ते - परहस्ते सरकारकडे जातो . अर्थात हे ' नेक्सेस '
हे समजून घेण्याची तसदी कोणी घेतच नाही.कारण " अखंड भारत " निर्मितीचा घोष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी भारतीय समाज मात्र नियोजनपूर्वक " खंड , खंड " करून टाकला आहे. " मंडल - कमंडल " च्या वादाच्याही पुढच्या स्थितीत आज देशाला नेऊन ठेवला आहे.
स्वतःला राष्ट्रीय न्यूज चॅनल तथा प्रिंट मिडिया म्हणविणाऱ्यांनी जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड ( आय.एम.एफ.) यांनी भारताला या पुढे कर्ज देऊ शकत नाही असे का सांगितले यावर कधी चर्चा घडवून आणली का ? का नाही ? कॉंग्रेस काळात न झालेल्या भ्रष्टाचाराचेही ढोल हाच मिडिया पिटत होता ! टेबल स्टोऱ्या तयार केल्या जात होत्या. भारताच्या जीडीपी इतके कर्ज या सरकारने देशावर करून ठेवले आहे. एकीकडे विश्वगुरू म्हणायचे आणि दुसरीकडे देश गहाण ठेवण्याइतपत कर्ज करायचे आणि आपल्याच देशाचे चलन ( रुपया ) आंतरराष्ट्रीय बाजारात नगण्य होईल इतक्या खालच्या किमतीवर आणून ठेवायचा ! यावर ना मिडियावर चर्चा ना सोशल मिडियावर ! भारताचा शेअर बाजार आज केवळ त्या पैसेवाल्यांसाठी आहे जे सरकारशी " साठगाठ " करून " पैसेसे पैसा " बनाते है ! बॅंकांकडे आज स्वतःची लिक्वीडीटी राहिली नाही इतक्या त्या कंगाल अवस्थेत सरकारी सपोर्टने कार्यरत आहेत. कारण जनतेचा बॅंकांमधील , LIC व तत्सम वित्तसंस्थामधील पैसा आज कर्ज रूपाने बड्या बड्या कार्पोरेटकडे परत न येण्यासाठी हस्तांतरित होत आहे व त्यांचे " नेटवर्थ " ( संपत्ती ) वाढवत आहेत .अब्जोपती होत आहेत आणि जनता " रोडपती " होत आहे. हां ! जनतेने जगत रहावे याची काळजी सरकार जनतेला " लाभार्थी" करून घेत आहे. हा या योजनेचा लाभार्थी तर तो त्या योजनेचा! नागरिक असा कोणी ठेवायचा नाही.ठेवला तर नको ते प्रश्न विचारत बसेल .
आणि अशी काळजी घेताना मोदी सरकारच्या भाजपाने जे या देशात २० टक्के मुस्लिम आहेत , त्यांची मतेही आम्हाला नकोत आणि त्यांचे उमेदवारही नकोत असे अगदी खुलेपणाने जाहीर करून टाकले.
समाज खंड खंड करणारी ही एक रेषा ! दुसरी गरीब - श्रीमंत ! त्यातही अनेक रेषा ! गरीबांमध्ये जातीच्या तर श्रीमंतांमध्ये श्रीमंतीच्या ! कार्पोरेट जगतात मित्र , सांगकामे , उपकृत , गरजवंत अशा रेषा ! अखंड भारत नावाचा देश ( भूभाग ) तर या सरकारला हवा ! पण अखंड भारतीय समाज मात्र नको ! कारण त्यांचे ऐक्य केंव्हाही आपल्याला सत्ता भ्रष्ट करू शकते .
पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी १९९० - ९१ मध्ये आणलेल्या जागतिकीकरणातून आलेली बाजार अर्थव्यवस्था आज खतम झाली आहे . आंतरराष्ट्रीय राजनीति आणि धोरणांची दिवाळखोरी यातून भारत आज एकटा पडला आहे. दुष्मन संबोधल्या जाणाऱ्या चीनने एकीकडे काश्मीर घाटीवर दावा केला आहे तर भारत आज मितीस याच देशावर निर्भर आहे. इतका की भारत - चीन व्यापारात देशाला १२५ बिलियन डॉलर्सचा तोटा होत आहे. ज्या हिंदू धर्माच्या नावाने या भाजपा आणि त्यांच्या सरकारने तमाम भारतीय समाज " संमोहित" करण्याचा प्रयत्न करताना सनातन शब्द बेमालूमपणे उपयोगात आणला त्याच धर्माच्या साधुसंतांचा हे सरकार जाहीरपणे अपमान करू लागले आहे. याचाच अर्थ समाज उथ्थानाची कोणतीही " विचारधारा" नसताना या मंडळींनी सनातन धर्माचा केवळ आपल्या संकुचित राजकारणासाठी वापर केला हे स्पष्ट होते. भाजपा - RSS ने सर्रासपणे आपल्या राजकारणासाठी धर्माचा वापर करायचा ! शंकराचार्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून स्वतः प्रधानमंत्री " पुजारी " झाले .
आणि आज अपमानित , पोलिशी अत्याचार सहन करावा लागलेल्या शंकराचार्य व साधुसंतांनी मात्र तरीही राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही असे भाजपा , आर.एस.एस. आणि त्यांचा " राष्ट्रीय" मिडीया आज दणकून प्रचार- प्रसार करत आहे. शिवाय या साधुसंतांनी जणू सरकार विरोधात देशातील विरोधी पक्षांकडून " सुपारी " घेतल्याचे हि मंडळी ध्वनित करू लागली आहेत. प्रत्येक अडचणीच्या वेळी एक सोयीचे नेरेशन तयार करून प्रसारित करायचे व वेळ तरी मारून न्यायची नाही तर बाजी तरी !
प्रखर आणि प्रदीर्घ अशा संघर्षानंतर मिळालेले स्वातंत्र्य भारताने " समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष " देश म्हणून जगायचं ठरवलं ! आणि आजचे सरकार ते खुंटीला टांगून " संघटीत हुकूमशाही" ने म्हणा की पुर्वीच्या मोजक्या अशा सरंजामशाहीने जगण्याकडे जनतेला घेऊन जात आहे. आजपर्यंत या देशाचा पंतप्रधान कधी कोणत्या जातीचा नव्हता ! तो या सरकारने आणला !सरकार वा मंत्री यांच्या निर्देशानुसार कधी कोणी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा संपादक नसे की कसले वृत्त नसे !
! आज ते आहे . नोकरशहा जे जनतेच्या पैशातून वेतन घेऊन देशसेवा करतात ते कधी यापूर्वी विद्यमान सरकारचा ढोल वाजवत नव्हते ! ते आज वाजवत आहेत. काल परवा तर एका नोकरशहा ने म्हणे यु .पी मुख्यमंत्र्याचा अपमान झाला म्हणून चक्क राजीनामा दिला ! सांप्रत प्रधानमंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही निवडणूक आयुक्तांनी कधी त्यासाठी देशाच्या लोकशाहीची मतदार यादी तयार केली नाही. आज हे प्रधानमंत्री पुरस्कृत आयुक्त बेलाशकपणे तशी यादी तयार करत आहेत.जनतेचे मुद्दे कितीही गंभीर असोत , जनता कितीही त्रासात , कष्टात असो ! त्याला अदृश्य करायचे असेल तर निवडून यायचं ! आणि म्हणायचं " जनता आमच्या पाठीशी आहे " ! हि तरकीब २०२४ च्या निवडणूकीत ४०० वरून २४० ( यातील ७९ हे आयोगाने निवडून आणलेले ) वर सत्ताधारी पक्ष आला त्यानंतर ती प्रत्येक निवडणुकीत वापरली गेली ! त्यानंतरची प्रत्येक निवडणूक सत्ताधारी पक्षाने जिंकली आहे.
तथापि जनतेच्या धुळफेकीसाठी उघड उघड पैशांचे वाटप करून , त्याला नियोजनपूर्वक हाय लाईट करून " मतदार विकले जातात" असे पर्सेप्शन प्रसारित केले गेले ! आज फेसबुक, तथा सोशल मीडियावर " जनता नालायक आहे, बेअक्कल आहे, पैशासाठी विकली जाते " अशा ८० टक्के प्रतिक्रिया येतात . या पध्दतीने जनतेमध्ये " जनतेलाच " खलनायक करून भाजपाचे खलपुरूष " नायक " बनून उभे राहिले. राज्य करत आहेत. आज जनतेने आजुबाजूचे सर्व काही विसरून केवळ आपल्या जगण्याची, आपल्या अस्तित्वाची लढाई लढत रहावी अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे ! आणि हा असाच समाज आज भाजपा - आर.एस.एस.ला हवा आहे .
0 टिप्पण्या