संपूर्ण भारतात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे अधोरेखित होतं. मात्र आजही इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना बाबासाहेबांचे नाव घ्यायची लाज वाटते. ज्यांच्यामुळे त्यांना सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत. त्यांचे साधे नाव देखील ते या दिवशी आपल्या भाषणात घेत नाही मग प्रतिमेचे पूजन करणे दूरच. मात्र नाशिकमध्ये या गोष्टीचा थेट पालकमंत्र्यांनाच जाब विचारण्याचे धारिष्ट्य महिला पोलिस माधवी जाधव यांनी केले. त्या वन विभागात कार्यरत आहेत. "बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही," असा थेट सवाल त्यांनी विचारला
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने माधवी जाधव यांनी महाजनांना थेट जाब विचारला. पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित माधवी जाधव यांनी घेतला होता. वादावादी झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत."मंत्री गिरीश महाजन प्रकरणात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल."एड. प्रकाश आंबेडकर.....
प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात गिरीश महाजन या कॅबिनेट मंत्राने घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख हि केला नाही. ही चूक जाधव नावाच्या वनखात्यातील महिला अधिकाऱ्याने त्या मंत्र्याच्या नजरेस आणून दिली. त्याबद्दल पोलीस अधिकारी त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्याचे पाहायला मिळाले. खरे तर तिच्या दंडाला धरून पोलीस गाडीत बसविले ही मुंबई पोलीस ऍक्ट कलम 68 खाली अटक आहे व समज देऊन सोडून देणे ही कलम 69 खाली कारवाई आहे. अशी अटक करण्याची गरज काय? प्रत्येक कॅबिनेट मंत्री जे भाषण करतो ते भाषण सरकारी अधिकारी तयार करतात व मग ते बोलतात ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मंत्री विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो ते त्या खात्यातील तळाच्या कर्मचाऱ्यापासून सेक्रेटरी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेले असते. चूक किंवा त्रुटी राहिली तर तळाच्या कर्मचाऱ्यावर अपुरी माहिती पुरविली या नियमा खाली विभागीय कारवाई होते. महाजनांच्या भाषणातील ही त्रुटी या कर्मचाऱ्याने दाखवून दिली हे खरे तर सरकारी, घटनात्मक कामच आहे. उलट या मंत्र्याचे अज्ञान हे घटना विरोधी कृत्य आहे. मंत्र्यांची चूक ही अज्ञानातून झालेली आहे की हेतू पुरस्कार केलेली आहे? याचा शोध प्रोटोकॉल विभाग, पोलिस व राज्य घटना मानणाऱ्या जनतेने घेतला पाहिजे..- सुरेश खोपडे
महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणे ही भाजपची जुनी खोड असून आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत त्याचे दर्शन घडले आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी आपल्या भाषणात संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांचा घोर अपमान केला. प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव आहे, आणि तिथेच संविधान निर्मात्यांचा विसर पडणे हे भाजपच्या 'महाराष्ट्रद्रोही' मानसिकतेचे लक्षण आहे. यावेळी वन विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी माधवी जाधव यांनी घेतलेला तीव्र आक्षेप हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाचा आवाज आहे. नोकरीतून सस्पेंड केले तरी मंत्र्यांची माफी मागणार नाही ही त्यांची भूमिका सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारी आहे!भाजपचे हे 'महापुरुष अपमान सत्र' नवीन नाही! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आज प्रजासत्ताक दिनी खुद्द मंत्र्यांकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला जातो. संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर आंबेडकर आंबेडकर नाव घेण्याची फॅशन आली आहे अस विधान केलं होत आणि आज नाशिकचे पालकमंत्री प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुल्लेखाने अवमान केला. वारंवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची भाजपची मनुवादी घाणेरडी वृत्ती जात नाही !भाजपला फक्त सत्ता आणि पैसा हवा आहे, या भूमीला घडवणाऱ्या महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात काडीचाही आदर नाही. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही! या निर्भय महिला अधिकारी माधवी जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सरकारने त्यांना सन्मानाने सोडून द्यावे आणि मंत्र्यांपासून संरक्षण द्यावे. अशा मंत्र्यांचा आणि भाजप सरकारचा धिक्कार असो!जय भीम ....खासदार वर्षाताई गायकवाड

0 टिप्पण्या