Top Post Ad

संत रोहिदास महाराजांच्या ६५० व्या जयंती महोत्सवाचा १ फेब्रुवारीला मुंबईत शुभारंभ

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोहळा रविवार, १ फेब्रुवारी  रोजी संध्याकाळी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज, मुंबई महानगर सह संघचालक प्रा. डॉ. विष्णू वझे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव समिती तसेच चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परळ येथील संत रोहिदास चौक (एसटी डेपो) येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून ती दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात समाप्त होणार आहे. मुंबई महानगर व परिसरातील शहरांतून मोठ्या संख्येने चर्मकार बांधव या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती समितीचे अध्यक्ष विजय इंगळे, व सरचिटणीस रवी पेवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवराम केदार, ज्ञानेश्वर ठोंबरे, धनंजय वायंगणकर, महिला सदस्य सुचित्रा इंगळे, गुरुदेव कांबळे, आदी समिती चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

६ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्मकार समाजाच्या अस्मितेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच परळ येथील संत रोहिदास भवनाच्या उर्वरित बांधकामासाठी निधी तात्काळ मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान ६५० व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर होऊन चर्मकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास विजय इंगळे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com