Top Post Ad

१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार... १० हजार २३१ मतदान केंद्र

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा, यासाठी महानगरपालिका आणि निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन केले आहे. या निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मिळून एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालयांसह शासकीय / निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्‍था तसेच खासगी इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्‍यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  भूषण गगराणी यांनी दिली आहे.

महानगरपालिका आयुक्त  गगराणी म्‍हणाले की,  बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली २२७ प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान केंद्र अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. मतदानाच्‍या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते आहे, याची आधीच खात्री करून घ्यावी. मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच २३ मध्‍यवर्ती मतदान केंद्रानुसार एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्‍यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, प्रसाधनगृहे, रॅम्‍प आदींची सुविधा करण्‍यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्‍याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्‍यांची नावे शोधण्‍यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्‍थापित करण्‍यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. एकंदरीतच, मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व सोयीस्कर पार पडावी यासाठी विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपाच्या जागांमध्ये मतदान केंद्रांची व्यापक व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे, असे देखील  गगराणी यांनी नमूद केले.

मतदान केंद्रांची विगतवारी लक्षात घेता, एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्‍यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय / निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार १११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत. तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय, खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये २ हजार ७१० मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, १ हजार ३७८ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तसेच १ हजार ५५ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असतील.

निवडणूक प्रक्रियेत बाधा... कनिष्ठ लेखापरीक्षक निलंबित- बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक करणा-या व निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविणा-या कनिष्ठ लेखापरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दीपक जोहरे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लेखापरीक्षकाचे नाव आहे. ते महानगरपालिकेच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात (RO) करण्यात आली होती. निवडणूक कामकाज करताना जोहरे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची , निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविल्याची तक्रार तसेच सबळ पुरावा महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला.

 प्रथमदर्शनी चौकशीमध्ये आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने जोहरे यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्याचे आदेश अतिरिक्त‍ महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. या प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. तथापि, कोणत्याही कर्मचाऱ्याने निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होईल असे वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती जोशी यांनी दिले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com