Top Post Ad

ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या नेत्याचा... झेंडा फक्त स्वराज्याचा आणि शिवबांचा

एक झेंडा, एक उत्सव’च्या घोषणेत धारावीत शिवजयंतीचा भव्य सोहळा


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मरक्षक युवा हिंदुत्वच्या वतीने मुंबईतील धारावी कोळीवाडा येथील होळी मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. “ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या नेत्याचा झेंडा – फक्त स्वराज्याचा आणि शिवबांचा झेंडा” या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने परिसरात ऐक्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सायंकाळी ५ वाजता महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, गड-किल्ले रक्षक व स्वच्छता शिलेदारांचा गौरव तसेच सन्मानचिन्ह व भेटवस्तू वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे सर्वात आकर्षण होते ते भव्य शाेभा यात्रेचे.कोणताही डि.जे.नाही किंवा त्याप्रकारचे वाद्य न लावता सायं. ६.३० वाजता पारंपरिक वादनाच्या गजरात शोभायात्रेला प्रारंभ झाला.  रात्री १० वाजेपर्यंत शोभायात्रेतील विविध पारंपरिक सादरीकरणांनी धारावीतील वातावरण दणाणून गेले.

शोभायात्रेत स्वराज्याची घोडदौड, वारकरी दिंडी, ढोल पथक, संबळ-हलगी, लेझीम नृत्य, मर्दानी खेळ, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक कलांचा देखणा आविष्कार पाहायला मिळाला. डीजे व ध्वनिप्रदूषण टाळून केवळ पारंपरिक वाद्यांवर भर देण्यात आल्याने शिवकालीन वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली. कार्यक्रमात फोटोग्राफी स्पर्धा, सिनेमॅटिक रिल्स स्पर्धा तसेच शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. धर्मरक्षक युवा हिंदुत्वचे अध्यक्ष कौशिक कोळी, आणि सचिव समीर भोईटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  संदीप कदम, आरती माने, प्रणाली शिंदे  यांच्यासह अनेक सभासदांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले.

यावेळी अध्यक्ष कौशिक शांताराम कोळी व सचिव समीर राजेंद्र भोईटे यांनी सांगितले की, चार-पाच वर्षांपूर्वी परिसरातील काही लहान मुलांनी शिवजयंतीची रॅली काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या प्रेरणेतून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. “महाराजांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवले. त्यामुळे त्यांच्या जयंतीसाठी वर्गणी न घेता स्वतःच्या कष्टाच्या पैशातून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला, दरवर्षी सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च करून हा सोहळा पार पाडला जातो, अशी माहितीही त्यांनी दिली. 

या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, सर्वधर्मसमभाव जपत आणि कोणतेही राजकारण न आणता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. येणाऱ्या पिढीपर्यंत शिवचरित्र, शौर्य आणि संस्कृती पोहोचविणे हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक नागरिक, युवक-युवती आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या शिवजयंती सोहळ्याने धारावी परिसरात एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना अधिक दृढ केली. या कार्यक्रमासाठी धारावी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांचे विशेष सहाय्य लाभले त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com