Top Post Ad

ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा रेल्वे उड्डाणपुल आजपासून वाहतुकीस खुला

दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या या पुलावरून दोन्‍ही दिशेने वाहतूक सुरु होऊन नागरिकांना सुलभ पर्याय निर्माण करणारा  ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱया रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले.  उपमुख्‍यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर  रितू तावडे यांच्‍या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आज  गुरुवार,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी .संपन्न झाला.   

यावेळी सदर पुलाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याचा निर्णय मुंख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान कौशल्या विभागाने राज्यातील सर्व आयटीआयली थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहीती मिळत आहे. पुर्वी या पुलाचे नाव मेजर नजरल ़जॉन बेलासिस असे होते.   
आमदार. गोपीचंद पडळकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, कृषीमंत्री दत्‍तात्रय भरणे  उपस्थित होते. तसेच स्थानिक आमदार अमीन पटेल, उप महापौर संजय घाडी, विरोधी पक्ष नेता श्रीमती किेशोरी पेडणेकर, समाजवादी पक्ष गटनेता तथा स्‍थानिक नगरसेविका श्रीमती अमरीन अब्रहानी, स्‍थानिक नगरसेवक  संतोष ढाले, स्‍थानिक नगरसेविका श्रीमती राजश्री भाटणकर, नगरसेवक. अजय पाटील, उप आयुक्‍त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्‍त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, पश्चिम रेल्‍वेचे मुंबई विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक श्री. पंकज सिंह, सहायक आयुक्‍त (डी विभाग) श्री. मनीष वळंजू , प्रमुख अभियंता (पूल) (प्रभारी)  राजेश मुळे उपस्थित होते. तसेच  महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर आणि विविध मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प)  अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पूल विभागाचे अभियंते यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाची उभारणी विक्रमी कालावधीत म्‍हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, निविदा अटी - शर्तींनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे. या पुलाच्‍या बांधकामाचा कार्यादेश (Work Order) सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये देण्‍यात आला. तर, प्रत्‍यक्ष कामकाजास १ ऑक्‍टोबर २०२४ रोजी सुरूवात झाली. रेल्‍वे रूळांवरील कामे रेल्‍वे विभागामार्फत तर तुळयांचे मजबुतीकरण (Girder Bracing), पुलाच्‍या प्रवास पृष्‍ठभागाची रचना (Deck Sheet), स्लॅब कास्टिंग, दोन्‍ही पोहोच मार्गांची कामे महानगरपालिकेने पूर्ण केली आहेत.
महानगरपालिका पूल विभाग (Bridges Department), रेल्वे विभाग, स्थानिक प्रशसकीय विभाग कार्यालय (Ward Office) आणि वाहतूक पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, नियोजनबद्ध कार्यपद्धती व अहोरात्र परिश्रमांमुळे हा उड्डाणपूल प्रकल्प मुदतीपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य झाले आहे. दक्षिण मुंबई परिसरातील वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील पूल महत्त्वाचा आहे. मुंबई सेंट्रल स्‍थानकानजीक रेल्वे मार्गावरील १३० वर्ष जुना ब्रिटिशकालीन उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्‍यानंतर पुलाचे निष्‍कासन करण्‍यात आले. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची विक्रमी वेळेत पुनर्बांधणी केली आहे. महानगरपालिका पूल विभाग, स्थानिक विभाग कार्यालयाच्‍या प्रयत्‍नांना रेल्‍वे विभागाचे अभियंते, वाहतूक पोलिस अधिकारी यांची मोलाची साथ लाभली.

या पुलाचे काम पूर्ण करणे आव्‍हानात्‍मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्‍यात 'बेस्‍ट' वाहिन्‍यांचे स्‍थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी निवासी बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्‍या एका गृहनिर्माण संस्‍थेची (Housing Society) बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, माननीय उच्‍च न्‍यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्‍प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्‍यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्धपणे केल्‍याने पावसाळ्याच्‍या ४ महिन्‍यांच्‍या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्‍यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍यात यश मिळाले आहे. भार चाचणी (Load Test), संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (Structural Stability Certificate), सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पुल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना - हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले आहे. एकंदरीत, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यास सज्‍ज आहे.

  • पुलाची रचना
  • - पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर
  • - पैकी पूर्वेला १३८.३९ मीटर आणि पश्चिमेला १५७.३९ मीटर
  • - रेल्‍वे हद्दीत ३६.९० मीटर अशी विभागणी
  • - वाहतूक मार्ग (Carriage Way) लांबी ७ मीटर
  • - दोन्‍ही बाजूला पुरेशा रूंदीचे पदपथ (Foothpath)
उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे 
-  दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा महत्‍त्‍वाचा दुवा
- पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार
- जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस मार्ग), डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्‍थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार 

ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रेल्‍वे उड्डाणपुलाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम आव्‍हानात्‍मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने पूल उभारणी यशस्‍वीपणे केली,  देशभरात अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणा-या, महिलांची फौज तयार करणा-या, माहेश्‍वरी साडी उद्योगाला प्रोत्साहन देऊन औद्योगिक विकास घडविणा-या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ युद्धकुशलता नाही, तर समाजकल्याण, धर्मरक्षण आणि आर्थिक प्रगती यांद्वारे आदर्श राज्यकारभार, उत्‍तम प्रशासक कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले. त्‍यांच्‍या कार्यास वंदन करण्यासाठी या उड्डाणपुलाचे नामकरण 'पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर उड्डाणपूल' हे करण्यात यावे. त्‍याबाबतची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिकेने करावी, असे निर्देश देखील श्री.फडणवीस यांनी दिले.

मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, ताडदेव - नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल जवळपास १३० वर्षे जुना झाला होता. त्याचे आयुर्मान पूर्णपणे संपले होते. त्यामुळे त्‍याची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. हा पूल बांधण्‍याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आणि अतिशय वेगाने पूर्ण केले. दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेले पुलाचे काम दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी म्हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण झाले. विशेषतः रेल्वे हद्दीतील कठीण कामकाजदेखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केल्‍याबद्दल सर्व अधिकारी, अभियंते यांचे कौतुक आहे. मुंबई महानगरात सध्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍पातील उड्डाणपुलाची गोरेगाव बाजू, विद्याविहार रेल्‍वे उड्डाणपूल, शीव (सायन) रेल्‍वे उड्डाणपूल, महालक्ष्मी रेल्‍वे उड्डाणपूल, नेहरू तारांगण आणि मानखुर्द उड्डाणपूल या विविध ठिकाणचे ६ मोठे उड्डाणपूल निर्मितीच्‍या अंतिम टप्प्यात आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून नजिकच्या कालावधीत या सर्व पुलांचे लोकार्पण केले जाईल, ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने यापुढेही विकास कामे गतीने आणि गुणवत्‍तापूर्वक करण्‍यावर अधिक भर द्यावा, असे निर्देशदेखील मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मुख्‍यमंत्री पुढे म्‍हणाले की, ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या रेल्वे उड्डाणपुलाचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे उड्डाणपूल' असे करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशाला एक आदर्श प्रशासक कसा असावा, हे दाखवून दिले. त्यांची संवेदनशीलता, पारदर्शक कारभार, त्यांनी तयार केलेली महिलांची पहिली लष्करी तुकडी, माहेश्वरी साडी, लघू उद्योग आणि देशभरात बांधलेली मंदिरे व घाट हे त्यांच्या महान कर्तृत्वाचे प्रतीक आहेत. अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यापुढेही जनहिताची कामे करत राहील, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

उपमुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्‍हणाले की, या पुलाचे काम पूर्ण करणे आव्‍हानात्‍मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्‍प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता महानगरपालिकेने घेतली. त्‍यामुळे पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍यात यश मिळाले आहे. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. जहांगीर बोमन बेहराम मार्ग, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्‍थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍प, मलनिस्‍सारण प्रकल्‍पाची कामे वेगाने पुढे जात आहेत. रखडलेले प्रकल्‍प मार्गी लागत आहेत. या पुढील कालावधीत देखील सर्व विकास कामे वेळेत पूर्ण व्‍हावीत, मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे करावीत, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.

 महापौर श्रीमती रितू तावडे प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना म्‍हणाल्‍या की, मुंबईतील रस्ते, उड्डाणपूल म्हणजे या महानगराच्या धमन्या आहेत. मुंबई महानगराचा विस्तार, लोकसंख्येची घनता, वाहनांची संख्या इत्यादी लक्षात घेता या धमन्या महत्त्वाच्या आहेत. हा पूल बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत, मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण करुन दाखवला आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन, पूल विभाग कौतुकास पात्र आहेत. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मोलाचे ठरले. पूल विभागाशी संबंधित सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांचेही या विक्रमी कामगिरीमध्ये आपापले योगदान आहे. त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस व इतर सर्व यंत्रणांनी केलेले सहकार्य आणि साधलेला समन्वय होय, असे श्रीमती तावडे यांनी नमूद केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com