नागपूरची दीक्षाभूमी म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त रक्ताचा एकही थेंब न सांडविता लाखों लोकांना बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा म्हणून क्रांतीभूमी! याच दीक्षाभूमीवर प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालय स्वर्ण जयंती महोत्सवा अंतर्गत 1964 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रा.सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते आणि डॉ.विमलकित्ती गुणसरी व डॉ. मधुकर कासारे यांचे उपस्थितीत दिनांक 28 सप्टेंबर 2014 रोजी चौकाचे कॉर्नर वर संरक्षक भिंतीचे आत गायकवाड यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सदर पुतळा सुरक्षित व दीक्षाभूमीचे परिसरात असल्याचे मानण्यात येत होते.दादासाहेब गायकवाड यांचे दीक्षाभूमी निर्माण आणि स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून जे योगदान होते त्याची आठवण म्हणून हा पूर्णाकृती पुतळा उभारून दीक्षाभूमीवर स्थापित करण्यात आलेला आहे.
वर्तमानात संपूर्ण दीक्षाभूमीला मजबूत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जुनी चांगली भिंत तोडून या नव्या संरक्षक भिंतीचे उभारणीत चौकातील कॉर्नरवर जुनी संरक्षक भिंतीचे आत असलेला दादासाहेबांचा पुतळा नव्या संरक्षक भिंतीत वगळण्यात येऊन त्याला बाहेर असल्याचे स्वरूप दिल्याचे दिसून येते. त्यामुळे पूर्वी दीक्षाभूमीचा भाग असलेला पुतळा आता कॉर्नर वर सार्वजनिक ठिकाणी रस्त्याचे कडेला असल्याचे दिसून येते. हे बघता दीक्षाभूमीवरून दादासाहेब गायकवाड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उचल बांगडी करण्यात करण्यात आली, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे या पुतळ्याला पूर्वीप्रमाणे दीक्षाभूमीचे आत सन्मानपूर्वक प्रस्थापित करण्याची मागणी करण्यात येत आहे.या प्रकरणी शासन व स्मारक समिती यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याची मागणी आहे अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो. सध्या संरक्षक भिंत उभारने सुरू आहे त्यामुळे यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत. गायकवाड यांचा पुतळा दीक्षाभूमी बाहेर काढण्याची गरज का निर्माण झाली? असे करताना स्मारक समितीची सहमती घेण्यात आली काय? पुतळा बाबत परिसरात कोणताही सूचनेचा फलक नसल्याने जनता संभ्रमित आहे. दीक्षाभूमीवरून गायकवाड यांचा पुतळा बाहेर काढणे म्हणजे त्यांचे दीक्षाभूमीतील कार्य ,योगदान पुसून नष्ट करण्याचा संदेश जात असून अशी कृती त्यांच्या कार्याचा अपमान ठरत नाही काय? असे प्रश्न आंबेडकरी समाजाच्या मनात उद्भवत आहेत. या प्रकरणी स्मारक समितीने खुलासा देण्याची गरज आहे. सदर पुतळ्याला दीक्षाभूमी संरक्षण भिंती बाहेर काढल्याने सदर पुतळा अतिक्रमित ठरवून भविष्यात रस्ता रुंदीकरण, वाहतुकीस अडथळा या नावाखाली हटवीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच वर्तमानात जी स्थिती दिसून येते, त्यावरून त्याचे स्वरूप सार्वजनिक जागेवरील पुतळा असे झाल्याचे स्पष्ट होते. एकूण तपशील लक्षात घेता दादासाहेब गायकवाड यांचा पुतळा दीक्षाभूमीच्या नव्या संरक्षक भिंतीचे आत स्थापित करावा. याप्रकरणी शासन व स्मारक समितीने वस्तूस्थिती आंबेडकरी जनतेसमोर मांडून गैरसमज होण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष पँथर प्रकाश बन्सोड ( 8388804190) यांनी केली आहे.
==============
बाबासाहेब - दादासाहेब यांची ताटातूट... डॉ. राजेंद्र गवई कशात गर्क आहेत ?
बातमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या खंडांची असो की दलितांच्या एखाद्या प्रश्नाची, ती पँथर प्रकाश बन्सोड यांनी दिली म्हणजे तिथे शंकेला जागा नसते. त्यामुळे ' कर्मवीर दादासाहेब गायकवाड दीक्षाभूमीतून बाहेर ! ' ही त्यांची सचित्र बातमी १०० टक्के खरी असणार यात वाद नाही. रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा पूर्णाकृती पुतळा दीक्षाभूमीची निर्मिती आणि स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या योगदानाच्या स्मृती जपण्यासाठी उभारलेला आहे. बाबासाहेबांच्या दलित मुक्तीच्या लढ्यातील दादासाहेब गायकवाड यांचे स्थान आणि कार्य हे सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांनी आत्मचरित्र काही लिहिले नाही. पण ' मी जर आत्मचरित्र लिहायला घेतले तर त्यातील सर्वाधिक पाने भाऊराव ( दादासाहेब) गायकवाड याच्यावर खर्ची पडतील ' असे बाबासाहेब म्हणाले होते. त्यात सारे काही आले. मग बाबासाहेबांपासून दादासाहेबांना कसे तोडणार?
आता दादासाहेबांच्या पुतळ्याला दीक्षाभूमीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असेल तर पहिला प्रश्न पडतो. अमरावतीचे दादासाहेब रा. सू. गवई हे आज हयात असते तर दीक्षाभूमीवर हा प्रकार घडू शकला असता काय? तिथल्या स्मारक समितीचे सध्या सरचिटणीस असलेले त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांचे त्या प्रकाराकडे लक्ष जाऊ नये, इतपत ते कोणत्या कामकाजात गर्क झाले आहेत, हा दुसरा प्रश्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या चळवळीचे दादासाहेब गायकवाड यांनी समर्थपणे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात रिपब्लिकन पक्षाची सूत्रे रा. सू. गवई यांच्या हाती आली. त्या अर्थाने दादासाहेब हे गवई यांच्या सोनेरी राजकीय आयुष्याचे शिल्पकार होते. त्याच जाणिवेतून गवई हे जीवनभर बाबासाहेब आणि दादासाहेब यांच्याविषयी कमालीचे हळवे होते. त्यांच्या सहवासात त्याची प्रचिती यायची.
रिपब्लिकन पक्षात तरुणाईला संधी आणि वाव न दिल्याचा आरोप रा. सू. गवई यांच्यावर नेहमी केला जायचा. या संदर्भात त्यांच्या सोबत असलेले बुजुर्ग नेते आर. जी.खरात आणि आर. बी. फाले यांच्याकडे बोट दाखवले जायचे. त्यावरून मी स्वतः गवई यांना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांबद्दल विचारले होते. त्यावेळी त्यांचे हळवेपण समोर आले होते. ते म्हणाले की, आर. जी. खरात आणि आर. बी. फाले हे थेट बाबासाहेबांचे निकटवर्तीय सहकारी आहेत. त्यांना बाबासाहेबांनी दिलेली पदे, सन्मान त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहील ! तो हिरावून घ्यायला मी कोण लागून गेलोय?
आर.जी. खरात, आर.बी. फाले हे दोघेही नेते बाबासाहेबांच्या हयातीत मुंबईत निवडून आलेले नगरसेवक होते. त्यांचा पक्षातील सन्मान गवई यांनी अखेरपर्यंत कायम राखला होता. आर.जी. खरात यांचे निधन झाले, तेव्हा स्मशान भूमीत त्यांना अखेरचा निरोप देताना गवई यांनी केले भाषण मला आजही स्मरणात आहे. तेव्हा गवई म्हणाले की, बाबासाहेबांना चळवळीत साथ दिलेले सहकारी शेकडो आहेत. पण सावलीसारखे त्यांच्यासोबत कायम राहण्याचा योग, संधी सर्वांना मिळाली नव्हती. पण मुंबई पोलिसांच्या अधिकृत अहवालात बाबासाहेबांसोबत शेकडो वेळा एकाच नेत्याचे नाव आढळते. तो नेता म्हणजे आर. जी. खरात ! अशा बुजुर्ग नेत्यांचा कृतज्ञतापूर्वक आदर, सन्मान करत आलेल्या रा. सू. गवई यांच्या मनात दादासाहेब गायकवाड यांच्या विषयीच्या भावना काय असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे दीक्षाभूमीवर बाबासाहेब आणि दादासाहेब यांची ' ताटातूट ' करण्याचे कृत्य आंबेडकरी जनता कदापिही सहन करू शकत नाही.

0 टिप्पण्या