बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता आज सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे मुंबईच्या रूपातील देशाच्या ग्रोथ इंजिनला गती देणारे आहे. रस्ते, पदपथ, पूल, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांपासून पायाभूत सुविधा प्रकल्पांपर्यंत, सामाजिक घटकांचे कल्याणापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि अद्ययावत तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करण्यापर्यंत सर्वसमावेशक बाबी यामध्ये आहेत. अधिकाधिक सूचनांचा समावेश करून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा असा हा अर्थसंकल्प सादर केला आहे, याचा आनंद आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगराच्या शाश्वत विकासासाठी तसेच या महानगरामध्ये जागतिक दर्जाचा विकास घडवण्यासाठी पर्यायाने आर्थिक राजधानीला बळकटी देण्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याजोडीला आता महानगरपालिकेच्या रुपाने तिसरे इंजिन जोडले गेले आहे. या ट्रिपल इंजिनाच्या गतीसमवेत धावता येईल, इतका बळ देणारा अर्थसंकल्प महानगरपालिका प्रशासनाने सादर केला आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली.
त्याचप्रमाणे, शिक्षण खात्याच्या वतीने आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा देखील विद्यार्थीभिमुख आहे. नवीन शैक्षणिक उपक्रमांसह हाती घेण्यात येणारे मिशन सफल, शालेय इमारतींची बांधणी व दुरुस्ती तसेच दर्जोन्नती, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान पार्कची उभारणी, डिजीटल क्लासरुम करणे, विज्ञान प्रयोगशाळांचे तसेच ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण, जादुई पिटारा उपक्रम, शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमध्ये विनामूल्य प्रवास अशा वैविध्यपूर्ण योजना / उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडण्यास हातभार लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ - २७ चे शिक्षण खात्याचे 'ई' अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समितीमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी तर स्थायी समितीमध्ये 'अ', 'ब' आणि 'ग' हे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी २५ फेब्रुवारी रोजी सादर केले. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना गगराणी यांनी सन २०२६ - २०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले. तर, शिक्षण समिती सभेत, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी सन २०२६ - २०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले. या प्रसंगी शिक्षण समिती सदस्य आणि स्थायी समिती सदस्य यांसमवेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा अर्थहिन अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी जमा केलेल्या होत्या, त्या ठेवी मोडून बीएमसीला दिवाळखोरीत ढकलण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात केला असून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांना वाढत्या प्रदुषणापासून सुटका हवी आहे, यासाठी ठोस धोरण ठरवण्याची आवश्यकता असताना बजेटमध्ये त्यासाठी फारशी तरतूद केलेली नाही. बेस्ट सध्या प्रचंड अडचणीतून जात असून ती सक्षम करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची गरज असताना केवळ १ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, यातून बेस्टच्या ताफ्यात नव्या बस खरेदी करणे, कामकाजात सुसुत्रता आणणे व प्रवाशांच्या सुविधेसाठी काहीही होणार नाही. बेस्टचे खाजगीकरण करण्यास यामुळे मोकळीकच मिळेल असे दिसते. सत्ताधारी भाजपा महायुतीने बजेटमध्ये बेस्टला वाऱ्यावर सोडल्याचेच दिसत आहे. मुंबईतील मराठी शाळा बंद होत असताना त्यासाठी ठोस धोरण नाही, सत्ताधारी पक्षांच्या बगलबच्च्यांना महापालिकेच्या शाळा देण्याचा घाट घातला जात आहे, तो थोपवण्याचा संकल्प दिसत नाही. पिण्याचे पाणी, सार्वजनिक आरोग्य सेवा यासाठी निधीची तरतूद केली असली तरी भरीव नसून ती प्रत्यक्षात जाते कुठे, आहे खरा प्रश्न आहे. आम्ही महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन वस्तुस्थिती पाहिली असता अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून आला, मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्याकडे साफ दुर्लक्ष होत असून कंत्राटदारांचे भले करण्यासाठी त्यांचे खिसे भरण्यासाठीच पैसा खर्च होत आहे. मुंबईकर मात्र दर्जेदार वैद्यकीय उपचारापासून वंचितच राहणार आहे, -, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड


0 टिप्पण्या