अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? आतापर्यंत 13-14 दिवसात काहीही तपास झाला नाही. याचा फक्त सीसीटीव्ही गोळा केला, पण त्यावर काहीही झालं नाही. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे.
बारामतीत ILS सिस्टिम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. या आधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की. या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. असे अनेक गंभीर प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या. तसेच विमान कंपनीच्या कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार गाडीने प्रवास करणार होते पण त्यांना एका नेत्याच्या भेटीमुळे उशीर झाला आणि त्यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या याच दाव्याला प्रमोद हिंदुराव यांनी पुष्टी दिली. अजित पवार त्यादिवशी विमान प्रवास करणारच नव्हते पण आदल्या दिवशी प्रफुल पटेल की अजून कुणाचा फोन आला. त्यादिवशी कामांना उशीर झाला, त्यामुळे त्यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट प्रमोद हिंदुराव यांनी केला.
अजित पवार यांचे बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी प्रफुल पटेल की आणखी कुणाचा फोन दादांना आला. मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाहीये, असे त्यांनी सचिवाला सांगितले. परंतु फाईल आणायला साडेसात आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या, तसेच अजित पवार यांचा अंगरक्षक कधीच अजितदादांच्या शेजारी विमानात बसला नव्हता. तो पहिल्यांदाच विमानात दादांच्या शेजारी बसला, तो फोटो त्याने त्याच्या घरच्यांना पाठवला. तोच फोटो त्यांचा अखेरचा ठरला, असेही प्रमोद हिंदुराव म्हणाले.

0 टिप्पण्या