Top Post Ad

'सिग्नल शाळा' सारख्या विधायक उपक्रमांना समाजातील सर्व घटकांकडून हातभार लाभावा- महापौर

मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय अर्थसहाय्यित, बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत तसेच समर्थ भारत व्यासपीठ संचालित सिग्नल शाळेचे लोकार्पण मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते आज (दिनांक २३ मार्च २०२६) करण्यात आले. चेंबूर परिसरात अमर महाल येथे सांताक्रूझ चेंबूर जोड मार्ग उड्डाणपुलाखाली सिग्नल शाळा सुरु करण्यात आली आहे. शाळाबाह्य आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सिग्नल शाळा ही संकल्पना ठाणे आणि नेरूळ मध्ये समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने राबवली आहे. 


आता मुंबईत चेंबूर येथे हा विधायक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रारंभी महापौरांच्या हस्ते नामफलक अनावरण करण्यात आले. तसेच, प्राथमिक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर व्यवसाय प्रशिक्षण, लघूउद्योग प्रशिक्षण, पाककला प्रशिक्षण, रोबोटिक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा या सर्वांची मान्यवरांनी पाहणी केली. सिग्नल शाळेच्या स्वतंत्र शिक्षण पद्धतीवर आधारित कृती पुस्तकांचे प्रकाशन देखील महापौर तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास महापौरांसह एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे, नगरसेविका कशिश फुलवारिया, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त  शंकर भोसले, उपशिक्षणाधिकारी  मुख्तार शहा, समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे संचालक  अजय जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी  भटू सावंत,  उल्हास कार्ले, अदिती दाते,  निखिल सुळे, तसेच मुलांना संघटित करण्यात योगदान देणारे आदिवासी पारधी महासंघाचे  संतोष पवार यांच्यासह विविध मान्यवर, स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

बेघर, स्थलांतरीत, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणारी सिग्नल शाळा मुंबई महानगरात सुरु झाली. नव्या शैक्षणिक धोरणांना अंगीकारत सुरु झालेला हा अभिनव प्रयोग विकसित भारत प्रयत्नांमध्ये मोलाचा भाग ठरणारा आहे. येत्या काळात देश-विदेशातील पर्यटक  मुंबईत येतील, तेव्हा या सिग्नल शाळेला आवर्जून भेट देतील, असा विश्वास महापौर तावडे यांनी व्यक्त केला. तावडे पुढे म्हणाल्या की,  शाळाबाह्य मुलांना एका छताखाली आणणे, हे अतिशय आव्हानास्पद असते. समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने ठाणे, नेरूळ येथील अनुभव गाठीशी घेऊन मुंबईत आता सिग्नल शाळा सुरू केली आहे. घर नसलेली तसेच परिस्थितीमुळे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारी मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांचे भविष्य सुधारण्याचे अतिशय आव्हानात्मक व विधायक असे हे काम आहे.
मागील २४ वर्षांमध्ये या प्रकारच्या प्रयत्नातून अभियंते, व्यावसायिक, क्रीडापटू घडले. त्याचबरोबर या मुलांच्या पालकांना आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी संस्था प्रयत्न करते, हे सगळंच काम अतिशय प्रेरणादायी आहे,  मुंबई महानगरात उड्डाणपुलांखाली, तसेच वाहतूक बेटांच्या शेजारी राहणारी अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ठोस प्रयत्न केले जातील. त्यासाठी मुंबईतील पूल परिसरांचे सर्वेक्षण केले जाईल, जेणेकरून अशा प्रकारच्या किती शाळा सुरू कराव्या लागतील, याची आखणी करता येईल. सिग्नल शाळा सारख्या उपक्रमांना शासन, प्रशासनासोबत समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावला पाहिजे. हा उपक्रम निरंतर सुरू राहिला पाहिजे. अशा उपक्रमांचे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ती तरतूद केली जाईल. पावसाळ्यात या शाळेला योग्य वातावरण लाभावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना करुन अधिकाधिक मुलांना या शाळांमध्ये पाठवावे, असे आवाहनही संबंधित पालकांना उद्देशून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.

प्रास्ताविक उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, सिग्नल शाळेसारखा समाज हिताचा प्रयोग ठाणे, नेरुळ पाठोपाठ आता मुंबई महानगरांत राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या आर्थिक साहाय्याने व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा आज सुरु झाली आहे. शिक्षणासोबतच आहार, तंत्रज्ञान शिक्षण, मानसिक स्थैर्य असं सगळं काही या शाळेत पुरवले जाते. परिणामी या मुलांची सर्व त्रासातून सुटका होते. या शाळेतील मुले साक्षर होवून पुढे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, मुख्य शैक्षणिक प्रवाहात येतील, यावरही भर देण्यात आला आहे. त्यादिशेने या शाळेच्या माध्यमातून पहिलं पाऊल टाकण्यात आलं आहे, असे त्या म्हणाल्या.

संस्थेच्या वतीने माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी  भटू सावंत म्हणाले की, उदरनिर्वाहाच्या शोधासाठी महानगरांकडे काही वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेले भटके विमुक्त कुटुंब, विविध उड्डाणपुले, पदपथांवर निवास करत असतात. अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनही प्रयत्न करीत आहे. मुख्य प्रवाहातील शाळा अशा मुलांसाठी लवचिक नसल्याने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक अनुशेषावर काम करण्याचे प्रयत्न समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने सिग्नल शाळेच्या माध्यमातून केले आहे. यामुळे अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. काही उच्च शिक्षण घेऊन रोजगारक्षम झाली. ठाण्याच्या धर्तीवर मुंबईत देखील  सिग्नल शाळा उभी रहावी यासाठी मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार व सहपालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला.  लोढा यांनी जिल्हा नियोजन निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातून वर्ग भरवण्यासाठी कंटेनर व इतर साहित्य आदी उपलब्ध करुन घेतले. त्यामुळे ही शाळा उभी राहू शकली, असे सांगून सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com