गुरव समाजाच्या मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन
देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींचे हक्क, मंदिर व्यवस्थापनातील गुरव समाजाला प्रतिनिधित्व, पुजाऱ्यांना मानधन व निवृत्तीवेतन, तसेच गुरव समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसह गुरव (पुजारी) समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ॲड.अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस डॉ.रंगनाथ गुरव,महासचिव विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिंदे, संतोष वाघमारे,मुख्य सरचिटणीस विजय ठोसर, अनिल पुजारी, प्रदीप पाटील, विशाल रोहणकर, संजय घोडके, संतोष शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष नितेश वैद्य, समीर गुरव, महिला प्रदेशाध्यक्ष मनिषाताई पांडे, श्रद्धाताई साखरे तसेच देवस्थान समिती प्रदेशाध्यक्ष धनंजय दरे आदी उपस्थित होते.
वंशपरंपरेने वहिवाट करणाऱ्या गुरव (पुजारी) समाजाच्या नावावर असलेल्या इनाम वर्ग-३ जमिनी संबंधित सनदधारकांना मालकी हक्काने (रीग्रँट) देण्यात याव्यात, ७/१२ उताऱ्यातील नोंदी पूर्ववत कराव्यात तसेच महसूल व वन विभागाच्या ३१ मे १९९६ च्या शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच देवस्थान ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के प्रतिनिधित्व देणे, उत्पन्न कमी असलेल्या देवस्थानांमधील पुजाऱ्यांना किमान वेतनानुसार मानधन देणे, ६० वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या पुजाऱ्यांना निवृत्तीवेतन देणे, तसेच गुरव समाजाच्या संरक्षणासाठी कठोर कायदा करण्यात यावा. याशिवाय गुरव समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय, ओबीसी दाखले मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये गुरव समाजाचा समावेश करणे या मागण्याही आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातून गुरव समाजाचे पदाधिकारी, पुजारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या