धर्मवीर आनंद दिघे सिव्हिल रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुपांतर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जात आहे. स्पेशालिटी रुग्णालयात ९०० बेड्सच्या रुणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. लवकरच या मल्टिस्पेशालिटी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हयाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटल पाहिले जाते. जिल्ह्यामध्ये ६ महापालिका, २ नगरपरिषद व २ नगरपंचायत तसेच दुर्गम भागातील टोकावडे, मुरबाड, शहापूर पालघर, रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्ण ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात येतात. त्यामुळे ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटलचे सुपर स्पेशालिटीमध्ये रूपांतर करण्यात आले असून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयात कर्मचारी वाढवण्यात येणार असल्याने आपल्या कार्यकर्त्यांची त्यात वर्णी लागावी म्हणून महापालिकेतील सत्ताधारी सेना-भाजप यांच्यात शीतयुद्ध सुरू झाली असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. महापालिकेच्या पहिल्या महासभेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असतानाच आता आपल्या कार्यकर्त्यांनाच या रुग्णालयात संधी मिळावी यासाठी दोन्ही पक्षातील नगरसेवक कार्यरत झाले असल्याची माहिती स्थानिक सुत्रांकडून मिळत आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच याबाबत निर्णय घेणार असल्याने सिव्हील रुग्णालयात होणाऱ्या कामगार भरतीत याच परिसरातील बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळावी. यासाठी सेवा भरतीत आपण जातीने लक्ष घालत असल्याचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी स्पष्ट केले. तसेच जास्तीत जास्त स्थानिक युवकांना तेथे रोजगार उपलब्ध करून द्यावा, परिसरातील तरुण युवकांना होणाऱ्या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. त्यानुसार यावर आपण विचार करून निर्णय घ्यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव असलेले ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र काही प्रशासकीय मान्यता अद्याप मिळाल्या नसल्याने रुग्णालयाचे लोकार्पणास विलंब होत आहे. 9 फेब्रुवारी 2026 ला रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र यामध्ये काही प्रशासकीय मान्यता बाकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. 1936 साली दानतपस्वी नारायण विठ्ठल सायना यांनी ही हमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती. 22 एप्रिल 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिव्हिलच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. 18 महिन्यांत रुग्णालय उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. रुग्णालयावरील हेलिपॅड आदी खास सुविधांच्या उभारणीमुळे कामाला विलंब झाला, तर आता प्रशासकिय मान्यता अभावी रुग्णालयाचे लोकार्पण रखडले आहे. प्रशासकीय मान्यतेची पूर्तता करूनच रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात येणार असल्याने आणखीन चार महिने वाट पहावी लागणार आहे.

0 टिप्पण्या