ठाणे महापालिकेवर २,५०० कोटींचे ओझे झाले आहे. त्यामुळे शहरात नव्याने विकासकामे होतील की नाही?, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे विकासकामांचा गाजावाजा होत असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा खालावली आहे. कोरोना काळात उत्पन्न घटल्यामुळे पालिकेचे जमा-खर्चाचे गणित बिघडले होते. दायित्व ३,५०० कोटींपर्यंत गेले होते. त्यानंतर करवसुली वाढवण्यावर भर देण्यात आल्याने दायित्व कमी होऊन वर्षभरापूर्वी सुमारे तीनशे ते चारशे कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, गेल्या वर्षभरात विविध विकास प्रकल्पांची कामे आणि ठेकेदारांची प्रलंबित देयके यामुळे पालिकेवर पुन्हा मोठा आर्थिक बोजा वाढल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे.. तर दुसरीकडे ठाणे पालिका क्षेत्रातील मल उदंचन व प्रक्रिया केंद्राचे कंत्राट मिळालेल्या एका कंपनीच्या नावाने त्याच नावाची बनावट कंपनी स्थापन करून पालिकेकडून कोट्यवधींचे बिल वसूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे; मात्र या प्रकरणी कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी कठोर चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला पुन्हा सहा मल उदंचन केंद्राचे काम १० वर्षासाठी ३८ कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे.
एप्रिल २०२५ मध्ये दायित्व १,५०० कोटींच्या आसपास होते. मात्र ठाणे महापालिका हद्दीत वर्षभरात झालेल्या '७२ ब'च्या कामांमुळे दायित्व पुन्हा १ हजार कोटींनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या '७२ ब'मध्ये अत्यावश्यक कामांचा समावेश असताना गटार, पायवाटा आदींसह इतर कामांचा समावेश करुन ती '७२ ब'मधून करून घेण्यात आल्याची माहिती देखील पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळेच दायित्व पुन्हा वाढल्याचेही बोलले जात आहे. तसेच पालिकेसह परिवहनच्या कर्मचाऱ्यांची देणी ६ देखील ५०० कोटींच्या आसपास थकीत आहेत. त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रकमा, सातवा वेतन आयोगातील फरकाची रक्कम आदींसह इतर देणी शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ठेकेदारांची देखील जानेवारी २०२५ पासून सुमारे २०० कोटींची देणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.असे असताना बनावट कंपनी स्थापन करून पालिकेकडून कोट्यवधींचे बिल वसूल केल्याचा प्रकारामुळेे ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.मल उदंचन केंद्र व कोविड रुग्णालयाच्या मल प्रक्रिया केंद्राच्या दुरुस्तीचे कंत्राट २०२० मध्ये मे. ए. के. इलेक्ट्रिकल अॅन्ड वर्क्स यांना दिले होते. कंपनीचा प्रकार -प्रोप्रायटरशिप असून, मालक अशोक केदासे आहेत. विजया बँकेतील खाते क्र. ५०४४०७७११००००९ यावर सुरुवातीला बिले देण्यात आली होती, असे डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे. काही महिन्यानंतर उपनगर अभियंता (यांत्रिकी) यांच्या मर्जीने कंत्राटदाराने मे. ए. के. इलेक्ट्रिकल अॅन्ड वर्क्स या कंपनीच्या नावाचीच दुसरी कंपनी तयार करून, स्वतः ती बिले बोगस कंपनीच्या नावाने निविदा कालावधी पूर्ण होईपर्यंत घेतली. बनावट कंपनीचा प्रकार पार्टनरशिप असा असून, जीएसटी नंबर आणि पॅन नंबर वेगळा आहे. त्यांचे बँकेतील खातेही वेगळे होते. संबंधित प्रकार हा ३ नोव्हेंबर २०२१ रोजी उघड झाल्यानंतरही कंत्राटदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या प्रकाराला यांत्रिकी विभागातील उपनगर अभियंता यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे. कोपरी येथील मल उदंचन केंद्रात मल जलापासून वीजनिर्मिती करण्यासाठी पालिकेने १० कोटी रुपये दिले; मात्र तेथे चक्क सोलार सिस्टीमचा वापर करून वीजनिर्मिती केली गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या प्रकल्पातून महापालिकेला १० टक्के रॉयल्टी कधीही मिळालेली नाही, अशा तऱ्हेने महापालिकेला आर्थिक डबघाईत आणण्याचे काम प्रशासनामार्फत होत असल्याने ठाणेकरांमध्ये प्रचंड संपात व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या